‘बिग बॉस १७’च्या घरात अंकिता लोखंडे व विकी जैन यांच्यात पहिल्या दिवसापासून कोणत्या ना कोणत्या मुद्द्यावरून वाद झालेले पाहायला मिळात आहेत. दोघेही खऱ्या आयुष्यात पती-पत्नी आहेत, मात्र या शोमध्ये आल्यापासून चाहत्यांना त्यांच्यात प्रेमापेक्षा जास्त भांडणच पाहायला मिळाली आहेत. घरात आल्यापसून विकीचे अंकितावर लक्ष नसल्याचे तिने अनेकदा बोलूनही दाखवले. अशातच आता विकीने त्याच्या समस्या अंकिताला सांगितल्या आहेत. यावेळी त्याने असं म्हटलं आहे की, “आज लोक त्याला विकी जैन या नावाऐवजी अंकिता लोखंडेचा पती या नावानेच अधिक ओळखतात”.
गेल्या भागात असे पाहायला मिळाले की, अंकिता व विकी हे घरातील बाहेरील परिसरात बसलेले असतात. यादरम्यान अंकिता विकीला असं म्हणते की, “तू या घरात आल्यापासून चांगला खेळत आहेस, पण इथे आल्यानंतर मी तूझ्यापासून दूर गेली आहे आणि आपल्यात आता काही नातंच उरलं नाही असं मला वाटत आहे”. यावर विकी असं म्हणतो की, “आज लोक मला विकी जैन म्हणून नाही तर अंकिता लोखंडेचा नवरा म्हणून जास्त ओळखतात. माझ्या व्यावसायिक क्षेत्रातले लोक, ज्यांच्यासमोर मी इथपर्यंत येऊन पोहोचलो आहे, तेही मला अंकिता लोखंडेचा पति या नावानेच ओळखतात आणि ही गोष्ट मी स्वीकारली आहे”.
विकीचे हे म्हणणे अंकिता शांतपणे ऐकून घेत “ही खूप चांगली गोष्ट आहे.” असं म्हणते. यावर विकी “ही खरंच चांगली गोष्ट आहे असं तुला वाटतं का? म्हणजे माझी स्वत:ची अशी काहीच ओळख नाही का?” असं अंकिताला म्हणतो. त्यांच्यात चाललेल्या या संभाषणात जिग्ना व्होरा येते. ती विकीला अंकिताबरोबर बसवते आणि म्हणते, “तू जगाला समजावतोस ते ठीक आहे. पण तू अंकिताला समजवू नकोस. तू फक्त अंकितासमोर बस आणि तिला मिठी मार. अंकिताला सध्या फक्त याचीच गरज आहे”. जिग्ना व्होराचे हे म्हणणे ऐकून अंकितादेखील खूश होते.
दरम्यान या संवादावरुन येत्या काळात अंकिता-विकी यांच्यातील अंतर कमी होऊन ते पुन्हा एकत्र आलेले पाहायला मिळणार का?, त्यांच्यातील प्रेम पुन्हा पाहायला मिळणार का? असा प्रश्न प्रेक्षकांना पडला आहे. यासाठी त्यांचे चाहतेदेखील तितकेच उत्सुक आहेत.