उत्तम अभिनेता, दिग्दर्शक अशी दुहेरी भूमिका साकारणारा अभिनेता प्रसाद ओक नेहमीच विशेष कारणामुळे चर्चेत असतो. अभिनयाबरोबरचं प्रसाद त्याच्या पत्नीबरोबरच्या रिल व्हिडीओमुळे चर्चेत असतो. सध्या प्रसाद त्याच्या कुटुंबासह परदेशवारी करण्यात व्यस्त आहे. प्रदेशात जातानाचे अनेक फोटो प्रसाद व मंजिरी यांनी त्यांच्या सोशल मीडिया अकाऊंटवरून शेअर केले होते. सध्या प्रसाद त्याच्या कुटुंबियांसह जर्मनी येथे गेला आहे. (Marathi Celebrity On Prasad Oak Son)
जर्मनी येथे केवळ फिरण्यासाठी नव्हे तर ओक कुटुंबाचं नाव मोठं करणाऱ्या एका सोहळ्याला त्यांनी हजेरी लावली होती. प्रसादचा एक मुलगा सार्थक शिक्षणानिमित्त परदेशात असून नुकताच त्याचा पदवी प्रदान सोहळा पार पडला. यावेळी प्रसादसह पत्नी मंजिरी आणि लेक मयांकदेखील उपस्थित होते. सार्थकने ‘बीए इन इंटरनॅशनल मार्केटिंग मॅनेजमेंट’ यामध्ये पदवी मिळवली असून हा अभिमानाचा क्षण प्रसाद व मंजिरी यांनी त्यांच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर शेअर केला आहे.
ओक कुटुंबियांच्या या आनंदाच्या सोहळ्यात अनेक कलाकार मंडळीही सहभागी झालेले पाहायला मिळत आहेत. सार्थकला मिळालेल्या पदवीप्रदान सोहळ्यानंतर प्रसाद व मंजिरी यांनी शेअर केलेल्या पोस्टवर सिनेसृष्टीतील अनेक कलाकार मंडळींनी कमेंट करत शुभेच्छांचा वर्षाव केला आहे. अभिनेत्री सुकन्या मोने यांनी सार्थकला शुभेच्छा देत म्हटलं आहे की, “मनःपूर्वक अभिनंदन. पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा,सार्थक”. तर अभिनेता सिद्धार्थ चांदेकरने कमेंट करत म्हटलं आहे की, “खूप चांगली प्रगती केली आहेस. आम्हाला तुझा अभिमान आहे”. याशिवाय सुबोध भावे, अमृता खानविलकर, सचित पाटील, अभिजित खांडकेकर, श्रेया बुगडे , जितेंद्र जोशी, मंजिरी भावे यांसारख्या अनेक कलाकारांनी सार्थक व त्याच्या पालकांचे म्हणजेचं प्रसाद-मंजिरीचे कौतुक करत त्यांना शुभेच्छा दिल्या आहेत.
प्रसादने लेकासाठी खास पोस्ट शेअर करत म्हटलं, “सार्थक. आम्हा सगळ्यांपासून खूप लांब राहून शिक्षण घ्यायचा निर्णय तू अत्यंत धाडसाने घेतलास. खूप कष्ट केलेस, अभ्यास केलास! आज हे क्षण पाहताना तुझ्या निर्णयाचं आणि कष्टांचं चीज झालं, असं मनापासून वाटतंय. तुझ्या पुढच्या प्रवासाला अगणित शुभेच्छा!”. तर मंजिरीने तिच्या पोस्टला “कमाल क्षण , कमाल अनुभव, कमाल भावना. आयुष्याचं सार्थक झालं!”. प्रसादची लेकासाठीची ही पोस्ट चर्चेत आली असून कलाकारांसह त्याच्या चाहत्यांनाही सार्थकला शुभेच्छा दिल्या आहेत.