बॉलिवूडमधील ज्यांना आजन्म तारुण्याचं वरदान लाभलं आहे असे अभिनेते म्हणजे अनिल कपूर. आज त्यांनी जरी वयाची ६० ओलांडली असली तरीही त्यांचं तारुण्य काही संपलेलं नाही. ते आजही एका तिशीतल्या तरुणासारखेच दिसतात. त्यांच्या फिटनेसची तर बातच निराळी आहे. अगदी भल्याभल्यांना लाजवेल असा त्यांचा फिटनेस फंडा आहे. आजही जरी अनिल यांना हिरोची भूमिका दिली तरीही ते ती भूमिका अगदी छान प्रकारे निभावतील यात काही शंका नाही. पण अनिल सध्या आगामी ‘ॲनिमल’ व ‘फायटर’ चित्रपटात दोन विविधांगी भूमिकांमध्ये दिसत आहे. खर तर या भूमिका त्यांच्यासाठी आव्हानात्मक नाहीत पण फिटनेसच्या अनुषंगाने तर हे एक मोठं चॅलेंजच आहे. अनिल यांनी एक पोस्ट शेअर करत याबाबत माहिती दिली आहे. (anil Kapoor physical transformation)
आगामी ‘ॲनिमल’ चित्रपटात अनिल हे रणबीर कपूरच्या ६५ वर्षीय वडीलांच्या भूमिकेत दिसणार आहेत. तर दुसऱ्या ‘फायटर’ चित्रपटात ते ४५ वर्षीय भारतीय वायुसेना अधिकारी हे पात्र साकारणार आहे. खरंतर या दोन्ही भूमिका एकमेकांपासून बऱ्याच वेगळ्या आहेत. एका ठिकाणी अनिल वडीलांची भूमिका तर दुसऱ्या ठिकाणी कर्तव्यदक्ष अधिकाऱ्याच्या वेशात दिसणार आहेत. त्यामुळे त्या भूमिकांसाठी वेगळा लूक व वेगळ्या फिटनेसची आवश्यकता आहे. त्यासाठी ६६ वर्षीय अनिल यांना या दोन्ही भूमिका छान प्रकारे निभावण्यासाठी बरीच मेहनत घ्यावी लागली आहे. त्यांनी यासाठी स्वतःचं फिजिकल ट्रांसफॉर्मेशन अगदी मनावर घेतलेलं दिसत आहे.
अनिल सोशल मीडियावर बरेच सक्रिय असतात. रविवारी त्यांनी इन्स्टाग्रामवर काही फोटोज् शेअर केले आहेत. या फोटोंना कॅप्शन देत अनिल लिहीतात, ‘दोन पूर्णपणे भिन्न पात्रांप्रमाणे स्वतःमध्ये बदल करणं खूप आव्हानात्मक आहे. ‘ॲनिमल’ चित्रपटाच्या ६५ वर्षीय बलबीरपासून ते ४५ वर्षांच्या रॉकी ऑफ फायटरपर्यंत…मी परिधान केलेल्या प्रतिष्ठित गणवेशाला न्याय देण्यासाठी, मला हे शारीरिक परिवर्तन करणं भाग होतं. आता मी दोन्ही चित्रपटांचं चित्रीकरण पूर्ण झालं असून प्रेक्षकांच्या प्रतिक्रिया जाणून घेण्याची उत्सुकता लागून आहे’.
अनिलच्या या पोस्टवर नेटकऱ्यांसह बऱ्याच बॉलिवूड सेलिब्रिटींनी बरेच लाईक व कमेंट केल्या आहेत. अभिनेता वरूण धवन लिहीतो, ‘जर आता तुम्ही फक्त १८ वर्षाचे आहात तर तुमच्यासाठी हे फिजिकल ट्रांसफॉर्मेशन सोपं झालं पण जेव्हा तुम्ही ३० वर्षाचे व्हाल तेव्हा तर हे आणखीनच कठीण होईल’, अशी कमेंट करत त्यांनी अनिल कपून आजही १८ वर्षीय तरुण दिसत असल्याचं लिहीलं आहे. तर अनिलच्या मुलगी अभिनेत्री सोनम कपूर, सुनील शेट्टी तसेच डायरेक्टर फराह खानने पण कमेंट करत अनिलच्या समर्पणाचं कौतुक केलं आहे.
अनिल कपूरची ही प्रेरणा देणारी पहिलीच पोस्ट नाही. अभिनेता नेहमीच सोशल मीडियाच्या माध्यमातून त्यांच्या चाहत्यांबरोबर त्याचे वर्कआऊट करतानाचे व्हिडीओ शेअर करत असतो. नुकतेच अनिल एका जाहिरातीत त्यांच्या ‘मिस्टर इंडिया’च्या लूकमध्ये दिसले. अगदी ३६ वर्षांपूर्वी प्रदर्शित झालेल्या चित्रपटातील त्याचा लूक ते अगदी आजही जाहिरातीत तसेच दिसत आहेत. त्यामुळे ही जाहिरात प्रदर्शित झाल्यानंतर चाहत्यांनी त्याच्या ‘मिस्टर इंडिया’ या हिट चित्रपटाच्या सिक्वेलची मागणी केली.