‘बिग बॉस १७’ हा शो दिवसेंदिवस अधिकच लोकप्रिय होत चालला आहे. घरातील टास्कमुळे आणि या टास्कच्या दरम्यान स्पर्धकांमधील होणाऱ्या वादामुळे हा शो आणखीनच रोमांचक होत आहे. दरम्यान या घरात स्पर्धकांमध्ये नेहमीच काहीना काही कारणांवरून वाद होत असतात. अशातच आता अभिनेत्री अंकिता लोखंडे व नील भट्ट यांच्यात वाद झाल्याचे पाहायला मिळाले आहे. नुकताच या शो चा एक प्रोमो प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. ज्यात ते दोघे एकमेकांशी भांडताना दिसत आहेत. (Bigg Boss 17 : New Promo Out On Social Media)
घरातील ‘नॉमिनेशन स्पेशल’ या टास्कमध्ये नील नॉमिनेट करतो. हे पाहून अंकिता नीलवर आरोप करते आणि त्याला ‘फट्टू’ (घबराट) म्हणून डिवचते. अंकिताच्या तोंडून ‘फट्टू’ हा शब्द ऐकून नीलला भयंकर राग येतो आणि तो तिची नक्कल करू लागतो. यानंतर अंकिता सोफ्यावर जाऊन बसते आणि तिच्यापाठोपाठ नीलसुद्धा तिच्यासमोर येऊन बसतो. पुढे सोफ्यावर जाऊन बसल्यानंतर त्यांच्यातील वाद सुरूच राहतात. ते एकमेकांना चिडवत असतात. यातून त्यांच्यात भांडण होते.
यावेळी अंकिता नीलला “माझ्याशी लांबून बोल, तुझ्या तोंडातून दुर्गंधी येतेय” असं म्हणत चिडवते. त्यावर नीलदेखील “तुझ्याकडून खोटारडेपणाची दुर्गंधी येतेय” असं म्हणतो. यादरम्यान त्यांच्यात जोरदार भांडण होते. अंकिता नीलवर “गप्प बस. निघ इथून” असं ओरडत त्याला गप्प बसण्यास सांगते. मात्र नील तिचं काही ऐकायला तयार नसतो. यावर तोही “तुझा आवाज माझ्यापेक्षा जास्त आहे” असं म्हणत तिच्यावर मोठ्या आवाजात ओरडतो.
दरम्यान या व्हिडीओखाली नेटकऱ्यांनी कमेंट्स करत त्यांच्या प्रतिक्रिया दिल्या आहेत. एका नेटकऱ्याने कमेंट करत असे म्हटले आहे की, “नील हा कॅमेऱ्यासमोर येण्यासाठी मुदाम अंकितला टार्गेट करत आहे.” तर दुसऱ्या नेटकऱ्याने “प्रेक्षकांचे लक्ष वेधून घेण्यासाठी तो अंकिताबरोबर भांडण करत आहे” असं म्हणत त्याच्यावर टीका केली आहे. त्यामुळे या नॉमिनेशन टास्कदरम्यान त्यांच्यात नेमकं काय होतं? हे पाहण्यासाठी चाहते उत्सुक आहेत.