मराठी मनोरंजनविश्वातील एक गुणी अभिनेता अशी स्वतःची ओळख निर्माण करणारा अभिनेता म्हणजे संकर्षण कऱ्हाडे. आजवर संकर्षणने नाटक, मालिका व चित्रपट अशा तीनही स्तरांत उत्तम भूमिका साकारली आहे. केवळ एक उत्तम अभिनेताच नाही, तर एक उत्तम लेखक, दिग्दर्शक व कवी म्हणूनही त्याची ओळख आहे. संकर्षण नेहमीच वेगवेगळ्या माध्यमांतून प्रेक्षकांच्या भेटीला येत असतो. सध्या तो नियम व अटी लागू या नाटकानिमित्त व्यस्त असल्याचं दिसतंय. काही दिवसांपूर्वी संकर्षणच्या ‘नियम व अटी लागू’ नाटकाचे प्रयोग अमेरिकेत यशस्वीरीत्या पार पडले. या यशस्वी दौऱ्यानंतर तो तब्बल दीड महिन्यांनी मायदेशी परतला आहे. (Sankarshan Karhade Special Post For Child)
संकर्षण नेहमीच सोशल मीडियावर सक्रिय असतो. तो त्याला आलेलं वेगवेगळे अनुभव कायमच पोस्ट करत चाहत्यांच्या संपर्कात राहत असतो. शिवाय संकर्षण त्याच्या दोन्ही मुलांचे अनेक व्हिडीओ व फोटोस शेअर करत असतो. संकर्षणाला जुळी मुलं असून त्यांची सर्वज्ञ , स्रग्वी अशी नाव आहेत. नाटकाचे अमेरिकेतील दौरे पूर्ण केल्यानंतर मायदेशी परतताच संकर्षण त्याच्या कुटुंबियांना वेळ देताना दिसत आहे. सध्या तो त्याच्या कुटुंबाबरोबर परभणी येथे त्याच्या गावी गेला आहे.
दिड महिन्यानंतर संकर्षण त्याच्या मुलांबरोबर त्याचा अमूल्य वेळ घालवताना दिसत आहे. संकर्षणने सर्वज्ञ , स्रग्वी यांच्याबरोबर गावात फिरतानाचा एक फोटो इंस्टाग्रामवरून पोस्ट केला आहे. त्याखाली कॅप्शन देत त्याने लिहिलं आहे की, “४५ दिवसांनी माझी पिल्लं मला भेटली. मग काय, बाबा भूssल ने, बाबा हम्मा पहायची, बाबा हम्माला हात लावायचा, बाबा पापम् (गाडी) वल जायचं, तर आजचा दिवस हा असा सुरू झाला.” संकर्षणचं त्याच्या दोन्ही मुलांवर प्रचंड प्रेम आहे. तो नेहमीच त्यांचे व्हिडीओ चाहत्यांसह शेअर करताना दिसतो.
‘माझी तुझी रेशीमगाठ’ या मालिकेतून प्रार्थना बेहरे, श्रेयस तळपदे यांना जितकं प्रेम मिळालं तितकंच प्रेम संकर्षणच्या समीर या भूमिकेला देखील मिळालं. मालिकेनंतर संकर्षण रंगभूमीवर रमला आहे. रंगभूमीवर देखील सध्या तो उत्तम काम करताना पाहायला मिळत आहे.’तू म्हणशील तस’,’नियम व अटी लागू’ या संकर्षणच्या नाटकांना प्रेक्षकांचा उत्तम प्रतिसाद मिळतं आहे.