अभिनेता प्रसाद जवादे व अभिनेत्री अमृता देशमुख ही जोडी सध्या लोकप्रिय जोडींच्या यादीत अव्वल स्थानावर आहे. सोशल मीडियावरही या जोडीला घेऊन बऱ्याच चर्चा रंगलेल्या पाहायला मिळतात. ‘बिग बॉस’मध्ये या दोघांमध्ये मैत्री झाली आणि ‘बिग बॉस’ नंतरही त्यांच्यातील मैत्रीचं हे नातं कायम राहिलं. काही काळानंतर या दोघांच्या मैत्रीचं रुपांतर प्रेमात झालं. सोशल मीडियावर फोटो शेअर करत त्यांनी त्यांच्या प्रेमाची कबुली दिली. त्यानंतर घरच्या घरीच त्यांनी साखरपुडा करत चाहत्यांना सुखद धक्का दिला. आता दोघांची लगीनघाई सुरु झाली आहे. सध्या या दोघांच्या केळवणाची सोशल मीडियावर जोरदार चर्चा सुरु आहे. (Amruta ukhana Post viral)
दोघांच्या पहिल्या केळवणाचे फोटो व व्हिडीओ सोशल मीडियावर बरेच व्हायरल झाले होते. विशेष म्हणजे या दोघांच्या केळवणाचं आयोजन अमृताच्या आजोबांनी केलं होतं. त्यानंतर ‘स्टार प्रवाह’ वाहिनीवरील ‘रंग माझा वेगळा’ या मालिकेतील कलाकारांनी या दोघांसाठी विशेष केळवाणाचं आयोजन केलं होतं. त्यानंतर आता पुन्हा एकदा अमृता व प्रसादच्या केळवणाचे फोटोस सोशल मीडियावरून व्हायरल झाले आहेत. यावेळच्या त्यांच्या केळवणाचं आयोजन देशमुख कुटुंबीयांनी केलं होतं.
या केळवणादरम्यानचे खास फोटोस शेअर करत एक स्पेशल पोस्ट अमृताने इंस्टाग्राम वरून शेअर केली आहे. या पोस्टमध्ये अमृताने सुंदर असा उखाणा ही घेतलेला पाहायला मिळतोय. या पोस्टमध्ये केळवणाच्या फोटोंसह अमृताने लिहिलं आहे की, “चांदीच्या ताटात पुरणपोळी, पुरणपोळीमध्ये जायफळ, प्रसादचं नाव घेतेय देशमुखांचं शेंडेफळ ! देशमुखांचं केळवण.” असं म्हणत तिने ही पोस्ट शेअर केली आहे. शिवाय दोघांचाही पारंपारिक अंदाज पाहायला मिळाला. या खास केळवणासाठी अमृताने सुंदर अशी साडी नेसली होती, तर प्रसादने कुर्ता परिधान केला होता.

अमृता व प्रसादसाठी त्यांनी परिधान केलेले सुंदर कपडे त्यांना अभिनेत्री हर्षदा खानविलकर यांनी भेट दिले आहेत. अमृताने पोस्टमध्ये हर्षदा खानविलकर यांचे आभार मानले असून ‘आम्ही कसे दिसतोय मम्मा?’ असा प्रश्न केला आहे. अमृताच्या या गोड प्रश्नाला हर्षदा यांनी कमेंट करत उत्तर देत म्हटलं आहे, ‘आमची सुनबाई ब्युटीफुल, तुझ्यामुळे चिरंजीवही देखणा दिसतोय. दोघांनाही खूप प्रेम’. अमृता व प्रसादच्या या खास पोस्टवर अनेक कलाकारांनी आणि चाहत्यांनी कमेंट केल्या आहेत. तर अनेकांनी लाईक्सचा वर्षांव केला आहे.