मराठी मनोरंजन क्षेत्रातील लोकप्रिय अभिनेत्यांपैकी एक अभिनेता म्हणजे अनिकेत विश्वासराव. अनिकेतने विविध मालिका, सिनेमांमधून स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली आहे. आजही त्याला ‘कळत नकळत’ मालिकेचा फेम स्टार म्हणून ओळखलं जातं. या मालिकेतील त्याच्या लूकवर आजही चाहती फिदा आहेत. त्याच्या अभिनयाचा मोठा चाहतावर्ग आहे. तो सोशल मीडियावर बराच सक्रिय असतो. नेहमी विविध फोटो-व्हिडिओ शेअर करत तो वैयक्तिक आयुष्याबद्दल अपडेट देत असतो. नुकतंच त्याने केलेली पोस्ट विशेष चर्चेत आहे. त्याने नामवंत विमानसेवा कंपनींवर टीका करणारी पोस्ट सोशल मीडियावर शेअर केली आहे. (Aniket angry post on airlines)
अनिकेतने इन्स्टाग्रामवर शेअर केलेल्या पोस्टवर देशातील नामवंत विमानसेवा देणाऱ्या कंपनीवर टीका केली आहे. नामवंत विमानसेवा पुरवणाऱ्या या कंपन्या निष्काळजी असल्याचं त्याने म्हटलं आहे. पोस्ट शेअर करत त्याने या कंपनींना टॅगही केलं आहे. ‘माझी चेक-इन बॅग गेल्या ४ दिवसांपासून गायब आहे. याबाबत तुमच्या बाजूने एकच प्रतिसाद येत आहे. ती म्हणजे खोटी आश्वासने व दिशाभूलपणा. ४ दिवस झाले तरीही तुम्ही माझ्या सामानाचा शोध लावू शकला नाही’.
वाचा – काय घडलं नेमकं अनिकेतबरोबर? (Aniket Vishwasrao angry post viral on airlines)
त्याने पुढे लिहीलं की, ‘फक्त माफीचा ईमेल माझ्या समस्येचे निराकरण करु शकत नाही. तमच्यातील व्यावसायिकतेचा व तुमच्या प्रवाशांबद्द्लच्या सहानुभूतीचा अभावा यामुळे मला खूप त्रास सहन करावा लागत आहे. मला आशा आहे की ही पोस्ट पाहिल्यानंतर आपण शक्य तितक्या लवकर माझ्या समस्येचं निराकरण कराल. मी एक प्रोफेशनल अभिनेता असून या इंडस्ट्रीत गेल्या २४ वर्षांपासून काम करत आहे. मला असा अनुभव कधीच आलेला नाही. त्या बॅगेत माझ्या नाटकाचे कॉस्ट्यूमही होते. त्यामुळे माझ्या कामात अडथळा आला आहे’. त्याने या पोस्टमधून अशीही अपेक्षा केली आहे की, यापुढे भविष्यात अशा समस्येचा सामना कोणालाही करावा लागणार नाही.
अनिकेतने त्याच्या विमानप्रवासाचा तपशील असणारा फोटोही या पोस्टमध्ये शेअर केला. त्याच्या पोस्टवर अनेक नेटकऱ्यांनी कमेंट करत विमानसेवा देणाऱ्या कंपनींवर टीका केल्या आहेत. अनेकांनी हा प्रकार त्यांच्याबरोबरही अनेकवेळा घडला असल्याचं सांगितलं. पण अजूनही पोस्टवर या संबंधित एअरलाइनची कोणतीही प्रतिक्रिया समोर आलेली नाही.