‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ हा कार्यक्रम संपूर्ण जगभरात प्रेक्षकांचं मनोरंजन करत आहेत. या कार्यक्रमातील सगळ्याच कलाकारांनी अक्षरशः धुमाकूळ घातला आहे. हास्यविरांच्या यादीत अव्वल स्थानावर असलेले हे हास्यजत्रेतील कलाकार चाहत्यांच्या मनात घर करून आहेत. ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ मधून खुमासदार विनोदी शैलीने रसिक प्रेक्षकांच्या मनावर ताबा मिळवणारा लोकप्रिय अभिनेता म्हणजे गौरव मोरे. गौरवला या कार्यक्रमामुळे विशेष लोकप्रियता मिळाली आहे. (Gaurav More On Maharashtrachi Hasyajatra)
अफलातून विनोदी शैली व उत्तम अभिनयाने गौरव मोरेने प्रेक्षकांना वेड लावलं आहे. गौरवचे हास्यजत्रेतील स्किट्स संपूर्ण जगभरात धुमाकूळ घालताना दिसतात. आजही प्रेक्षक हे स्किट्स आवडीने पाहतात. गौरवचा खूप मोठा चाहतावर्ग आहे. अशातच सध्या गौरव मोरे ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’मध्ये दिसत नसल्याने या चाहत्यांमध्ये नाराजीचा सूर पाहायला मिळत आहे. हास्यजत्रेतून गौरवने एक्झिट घेतली का?, गौरव हास्यजत्रेत का दिसत नाही? असे अनेक प्रश्न चाहत्यांसमोर उभे राहिले आहेत. अशातच अभिनेत्याने या प्रश्नांचं उत्तर एका मुलाखतीदरम्यान दिलं आहे.
“गौरव मोरेने ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ का सोडली?” हा प्रश्न गुगलवर सर्वाधिक सर्च करण्यात आलेला प्रश्न होता. हा प्रश्न भार्गवी चिरमुलेच्या पॉडकास्टमध्ये गौरवला विचारण्यात आला. यावर तो म्हणाला, “’महाराष्ट्राची हास्यजत्रा’ कार्यक्रम मी सोडला नाही. मी सध्या ब्रेकवर आहे. माझ्या खांद्याला दुखापत झाली आहे. त्यामुळे मी दोन ते तीन महिन्यांच्या ब्रेकवर आहे. एखादं स्किट आलं तर त्यात ओढाताण होते. माझे स्किट तुम्ही बघता त्यामध्ये मारामारीही अधिक असते. त्यामुळे पुन्हा पुन्हा खांद्याला दुखापत झाली त्याजागी ताण येतो. त्यादरम्यानच्या काळामध्ये ३० ते ३५ दिवसांचं माझ्या चित्रपटाचं कामही आहे. अशी दोन कामं आहेत. त्यामुळे ब्रेकच घेतला आहे”.
गौरवने हास्यजत्रेतून ब्रेक घेतला असल्याचं समोर आलं आहे. यावरून त्याने हास्यजत्रा सोडली नसल्याच्या चर्चांना पूर्णविराम मिळाला आहे. आता गौरव लवकरात लवकर बरा होऊन हास्यजत्रेत केव्हा परतणार याकडे साऱ्यांच्या नजरा लागून राहिल्या आहेत.