दिवंगत अभिनेते लक्ष्मीकांत बेर्डे हे आजही मराठीसह हिंदी प्रेक्षकांच्या मनावर राज्य करतात. लक्ष्मीकांत बेर्डे यांनी एकेकाळी फक्त मराठी नाही तर हिंदी सिनेसृष्टीलाही आपल्या अभिनयाने वेड लावले. लक्ष्मीकांत यांनी चंदेरी दुनियेसह रंगभूमीचे मंचदेखील गाजवले. त्यांच्याच पावलांवर पाऊल ठेवत त्यांचा लेक अभिनय बेर्डेदेखील मराठी चित्रपटसृष्टीत आपला ठसा उमठवत आहे. अभिनय बेर्डेने काही वर्षांपूर्वीच मनोरंजन क्षेत्रात पाऊल टाकलं. त्याचा ‘ती सध्या काय करते?’ हा चित्रपट बराच गाजला.
‘ती सध्या काय करते?’नंतर ‘अशी ही आशिकी’, ‘मन कस्तुरी रे’, ‘रंपाट’, ‘बॉईज ४’ या चित्रपटांतून अभिनयने प्रेक्षकांचे चांगलेच मनोरंजन केले. चित्रपटांतून मनोरंजन केल्यानंतर अभिनय आता रंगभूमीद्वारे प्रेक्षकांचे मनोरंजन करायला सज्ज झाला आहे. नुकतेच अभिनयचे ‘आज्जीबाई जोरात’ हे नाटक प्रेक्षकांच्या भेटीला आले असून या नाटकाचा लेखक, दिग्दर्शक व गीतकार क्षितिज पटवर्धनने अभिनयसाठी एक खास पोस्ट लिहिली आहे. क्षितीजने सोशल मीडियावर अभिनयचा एक फोटो शेअर केला आहे, ज्यामध्ये त्याच्यामागे भिंतीवर लक्ष्मीकांत बेर्डे यांचाही फोटो पाहायला मिळत आहे.
क्षितीजने लक्ष्मीकांत यांच्याबरोबरचा अभिनयचा फोटो शेअर करत एक पोस्ट लिहिली आहे. या पोस्टमध्ये अभिनयचे कौतुक करत त्याने असं म्हटलं आहे की, “मागे लक्ष्मीकांत बेर्डे सरांचा फोटो पाहिला आणि पुढे अभिनय उभा आहे. फोटो काढताना असं वाटलं की, बरीच मुलं वारसा घेतात, पण याने (अभिनयने) वसा घेतला आहे. तू जिथे कुठे जाशील तिथे त्यांचा आशीर्वाद तुझ्या पाठीशी असेल! अतिशय गुणी, मेहनती, समजूतदार आणि उत्स्फूर्त अभिनेता. ‘आज्जीबाई जोरात’ पाहून प्रेक्षक आपल्याच मुलाचं कौतुक करावं तसं अभिनयचं कौतुक करतात. ही त्याची कमाई आणि त्याच्या आई-वडिलांची पुण्याई आहे.”
तर क्षितीजच्या या पोस्टवर अभिनयनेही उत्तर देत असं म्हटलं आहे की, “सर माझ्याकडे शब्द नाहीयेत, पण तुम्ही दिलेल्या संधी बद्दल तुमचे जितके आभार मानावे तितके कमी आहेत, आपल्या नाटकाने मला एक अभिनेता म्हणून आणि एक माणूस म्हणून खूप गोष्टी दिल्यात. माझ्यावर हा विश्वास दाखवण्याबद्दल तुमचे खरंच खूप आभार आणि खूप जास्त प्रेम.”