आपल्या आवडत्या कलाकारांना भेटणे व त्यांच्याशी संवाद साधायची संधी मिळणे हे प्रत्येकाचेच स्वप्न असते. मात्र ही संधी प्रत्येकालाच मिळते असं नाही. पण ज्यांना ही संधी मिळते त्यांचा आनंद गगनात मावत नाही आणि असंच काही एका मराठी अभिनेत्याबरोबर झाले आहे आणि हा अभिनेते म्हणजे स्वप्नील राजशेखर. बॉलिवूडमध्ये नव्वदीचा काल गाजवलेले ज्येष्ठ अभिनेते धर्मेंद्र यांना भेटण्याची संधी त्यांना मिळाली आहे. धर्मेंद्र यांनी आजवर त्यांच्या अभिनयाने मोठा चाहतावर्ग निर्माण केला आहे. त्यापैकी एक म्हणजे अभिनेते स्वप्नील राजशेखर. स्वप्नील राजशेखर यांनी नुकतीच अभिनेते धर्मेंद्र यांची राहत्या घरी भेट घेतली. ते धर्मेंद्र यांना भेटून त्यांना इतका आनंद झाला की त्यांनी हा आनंद सोशल मीडियाद्वारे व्यक्त केला आहे. धर्मेंद्र यांच्या पहिल्या भेटीचे काही खास क्षण व फोटो या पोस्टद्वारे शेअर केले आहेत. तसेच या फोटोंसह त्यांनी एक पोस्टदेखील लिहिली आहे. त्यांची ही पोस्ट सध्या खूपच चर्चेत आहे. या पोस्टद्वारे त्यांनी त्यांचा आनंद व्यक्त केला आहे. (Swapnil Rajshekhar On Facebook)
यात त्यांनी असे म्हटले आहे की, “हे होणार होतंच. हे माझ्या नाशिबातच लिहिलं होतं. धरम्या (धर्मेंद्र) यांना भेटून मला हेच आणि असंच वाटणार होतं. त्याला (धर्मेंद्र) याआधी न भेटताही तो असाचं प्रेमाने भेटेल आणि मायेने पाठीवर हात फिरवेल हे मला माहीत होतंच. तो (धर्मेंद्र) आहेच तसा. प्रेमळ, मायाळू, मनमोकळा, जिंदादील, दर्यादिल, जिंदगी से भरपूर. हे त्याला (धर्मेंद्र) चित्रपटात, टिव्हीत, सोशल मीडीयावर बघून, त्याच्याबद्दल ऐकून कळत होतं आणि अगदी तसंच झालं. अपेक्षेपेक्षा कितीतरी जास्त मिळालं आणि मी भरुन पावलो. तो धरम (धर्मेंद्र) आहे. भारतीय चित्रपटसृष्टीतल्या सर्वात देखणा, सर्वात हँडसम व भन्नाट अभिनेत्यांपैकी एक तसेच तो बेफाट माणुस आहे. एक गोष्ट त्याला इतर सुपरस्टार्सपेक्षा वेगळं बनवते ती म्हणजे, त्याला आजही प्रत्येक माणसाशी आत्यंतिक प्रेमाने सेहनेवालीया धरमेंद्र देओल म्हणून कनेक्ट करता येतं. त्याला प्रेम उत्तम रितीने स्वीकारता येतं… ते दुप्पट करुन देता येतं. आणि हे वाटतं तितकं सोपं नाही. अनेक स्टार्स, सुपरस्टार्स चाहत्यांच्या अपरंपार प्रेमाने भांबावतात, ओशाळतात, संकोचतात, कधी कधी तर तुसडे, श्रृढ होतात. धरम (धर्मेंद्र) मात्र अशा प्रेमाने भारावतो, हळवा होतो. हात पसरुन तो प्रेमाने भेटणाऱ्याला कवेत घेतो आणि हे खूप दैवी आहे. यामुळे समोरच्याचं आयुष्य उजळुन निघतं. गेल्या चार वर्षांपासून मनात होतं की धरम्याला (धर्मेंद्र) भेटायला हवं. यासाठी मी माफक प्रयत्न केले. मात्र योग आला नाही. पण इच्छा प्रबळ होती.”
आणखी वाचा – ‘CID’ फेम अभिनेत्रीला कुटुंबियांकडून मारपीट, जखमी अवस्थेत पोलिस स्टेशनमध्ये पोहोचली अन्…
यापुढे त्यांनी धर्मेंद्र यांच्याबरोबर भेट कशी झाली हे सांगताना असे म्हटले आहे की, “अचानक एकदा रात्री अजयचा फोन आला, “काय करतो आहेस? उद्या धरम (धर्मेंद्र) ला भेटायची शक्यता आहे. अजयनं सगळी जादू घडवुन आणली. ते “किसी चीज को शिद्दत से चाहो तो” ते सगळं झालं आणि थेट धरम (धर्मेंद्र)च्या त्या सुप्रसिध्द बंगल्यावर माझ्या आयुष्यातला हा सोनेरी योग आला. नशीब काढलं मी. माझ्यासारखे लाखोजण त्याच्याकडे अपार प्रेमाने, श्रध्देने, भारावूनच बघतील. त्याने माझ्याकडे इतक्या मायेने पहावं. पाठीवरुन, डोक्यावरुन हात फिरवावा. यासाठी खरंच नशीब लागतं. त्याचा हात आजही ढाई किलोपेक्षा जास्त वजनाचा आहे. पंजा माझ्या दिडपट आहे. पण त्याचे तळवे अत्यंत उबदार, मायाळु आहेत. तर मित्रांनो, जगात देव आहे आणि स्वर्गही इथेच आहे आणि जगात आपला ‘यमला पगला दिवाना’ धरम (धर्मेंद्र)ही आहे. लहानपणापासूनच्या अनेक धरम (धर्मेंद्र) वेड्या मित्रांची प्रकर्षाने आठवण आली आणि नरेंद्र देसाई, रोहित हळदीकर, गुरुदत्त सोनसूरकर तुमची खूपच आठवण आली.”
आणखी वाचा – श्रेयस तळपदेच्या तब्येतीबाबत मंगेश देसाईंची खास पोस्ट, फोटो शेअर करत म्हणाले, “तुझ्या पाठीशी…”
दरम्यान, अनेक नेटकऱ्यांनी या पोस्टला लाईक्स व कमेंट्सद्वारे प्रतिसाद दिला आहे. “खूप छान, खूप भारी, सोनेरी क्षण, तुम्ही खूप नशीबवान आहात, क्या बात है, ग्रेट भेट” अशा अनेक कमेंट्स करत या फोटोंना पसंती दाखवली आहे. राजशेखर हे सध्या ‘झी मराठी वाहिनी’वरील ‘तुला शिकवीन चांगलाच धडा’ या मालिकेतून प्रेक्षकांचं मनोरंजन करत आहेत. यामध्ये त्यांनी ‘चारुहास’ हे अधिपतीच्या बाबांची भूमिका साकारली आहे.