सेलिब्रिटी मंडळींना सार्वजनिक ठिकाणी पाहिलं की सामान्य व्यक्तींना त्यांचा हेवा वाटतो. पण एरव्ही प्रवास करत असताना सामान्यांप्रमाणेच सेलिब्रिटींनाही विविध अडचणींचा सामना करावा लागतो. काही कलाकार मंडळी कामानिमित्त बाहेर जात असताना स्वतः गाडी चालवतात. अभिनेत्री वंदना गुप्तेही त्यापैकी एक आहेत. पण गाडी चालवत असताना त्यांना एकदा एक विचित्र अनुभव आला. याचबाबत त्यांनी आता भाष्य केलं आहे.
सध्या वंदना गुप्ते ‘बाईपण भारी देवा’ या चित्रपटामुळे चर्चेत आहेत. या चित्रपटाने आतापर्यंत ८० कोटी रुपयांचा टप्पा पार केला आहे. वंदना यांचा चित्रपटसृष्टीमधील तगडा अनुभव व त्यांच्या भूमिका आजवर सिनेरसिकांनी पाहिल्या. या चित्रपटामध्ये त्यांनी पुन्हा एकदा उत्तम भूमिका साकारत प्रेक्षकांची मनं जिंकली. आता वंदना गुप्ते झी मराठी वाहिनीवरील ‘खुपते तिथे गुप्ते’ या कार्यक्रमात हजेरी लावणार आहेत.
झी मराठी वाहिनीने इन्स्टाग्राम अकाऊंटद्वारे ‘खुपते तिथे गुप्ते’च्या नव्या भागाचा प्रोमो शेअर केला आहे. या प्रोमोमध्ये त्यांना गाडी चालवताना आलेल्या अनुभवाबाबत त्या बोलत आहेत. वंदना यांना एकदा एका रिक्षावाल्याने शिवी दिली होती. यावेळी त्यांनी नेमकं काय केलं? हे अगदी खुलेपणाने सांगितलं.
वंदना गुप्ते म्हणाल्या, “एका रिक्षावाल्याला मी ओव्हरटेक करुन गेले. म्हणून त्याने मला शिवी दिली. त्याने शिवी दिल्यानंतर मी गाडीमधून खाली उतरले. त्याला मी म्हटलं, तू मला शिवी दिली आहेस. मला एक आयडिया माहित होती. मी ती रिक्षा पलटी केली. रिक्षावालाही आतमध्ये बसला होता. मी तशीच गाडीमध्ये बसले आणि तोपर्यंत सिग्नल सुरु झाला”. वंदना यांचा हा अनुभव ऐकून अवधूतही हसू लागला.