अभिनेत्री प्राजक्ता माळीने आजवर तिच्या अभिनय व सहज सुंदरतेने प्रेक्षकांच्या मनात घर केलं आहे. नेहमीच ती काही ना काही पोस्ट करून सोशल मीडियाच्या माध्यमातूनही चाहत्यांच्या संपर्कात राहत असते. प्राजक्ताचे लाखो चाहते दिवाने आहेत. नेहमीच ती तिच्या हटके फोटोंनी अनेकांना घायाळ करते. प्राजक्ता राजकारणात जाणार असल्याचीही बरेचदा चर्चा रंगलेली पाहायला मिळाली. अशातच पुन्हा एकदा तिने इंस्टाग्रामवरून केलेल्या पोस्टमुळे प्राजक्ता राजकारणात प्रवेश करणार असल्याची चर्चा रंगली आहे. (Prajakta Mali On Aditi Tatkare)
प्राजक्ताने शेअर केलेल्या इंस्टाग्राम पोस्टने साऱ्यांचं लक्ष वेधून घेतलं आहे. महिला व बाल विकास मंत्री आदिती तटकरे यांच्याबरोबर तिने नुकत्याच एका कार्यक्रमाला हजेरी लावली होती. या कार्यक्रमादरम्यानचे काही खास फोटोस प्राजक्ताने सोशल मीडियावरून शेअर केले आहेत. तिच्या या फोटोंनी राजकारणात प्रवेश करणार असल्याच्या चर्चांना पुन्हा एकदा उधाण आलं आहे. कारण पोस्ट शेअर करत प्राजक्ताने दिलेल्या कॅप्शनने ही चर्चा वाढविली आहे, असं म्हणायला हरकत नाही.
प्राजक्ताने पोस्ट शेअर करत म्हटलं आहे की, “महिला व बाल विकास मंत्री, महाराष्ट्र राज्य की आयुष्यभरासाठी मैत्रीण?, मा. आदिती ताई तटकरे. स्वतः महिला व नाव “आदिती”चं असल्याने महिलांचे प्रश्न जाणून स्त्री शक्तीस आधार देणारं खंबीर, झंझावाती नेतृत्व त्यांच्यात आहेच. बरोबरीने लक्षवेधी, असाधारण स्मृती, दयाळू स्वभाव आणि त्वरित निर्णय हे त्यांच्यातील गुण मला खूप प्रेरणा देतात. त्यांना जवळून ओळखून आनंद झाला.”

पुढे तिने असंही लिहिलं आहे की, “काल रात्री आम्ही मज्जा केली. आमचे विचार खूप जुळतात. आपण अनेकदा भेटलं पाहिजे आणि महिला सुरक्षा, सक्षमीकरणासाठी लवकरच एकत्र काम केलं पाहिजे. आपण करू नये का?” असा प्रश्न आदिती तटकरे यांना विचारत तिने ही पोस्ट आदिती तटकरे यांना टॅगदेखील केली आहे. प्राजक्ताच्या या पोस्टवर नेटकऱ्यांनी लवकरच राजकारणात प्रवेश करणार अशा कमेंट करायला सुरुवात केली आहे.