मराठी सिनेसृष्टीतील लोकप्रिय अभिनेत्यांच्या यादीतील एक नाव म्हणजे अभिनेता हार्दीक जोशी. ‘तुझ्यात जीव रंगला’ या मालिकेतून हार्दिक घराघरात पोहोचला. आता तो त्याच्या ‘जाऊ बाई गावात’ या कार्यक्रमातून प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. येत्या ४ डिसेंबरपासून त्याचा हा नवीन रिअॅलिटी शो प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या शोचं टायटल ट्रॅक नुकतंच प्रदर्शित झालं होतं. अशातच हार्दिकवर दुःखाचा डोंगर कोसळला. याच आठवड्यात हार्दिकच्या वहिनीचं निधन झालं. त्याने स्वतः भावूक पोस्ट करत याबद्दलची माहिती दिली होती. आता या सगळ्या दुःखातून हार्दिक सावरताना दिसत आहे. हार्दिक व अक्षया यांचा आज लग्नाचा वाढदिवस आहे. त्यानिमित्त हार्दिकने इन्स्टाग्रामवर पोस्ट शेअर करत लग्नाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. (hardeek joshi share post of his wedding anniversary)
हार्दिकने अक्षयाबरोबरच्या गोड क्षणांचे फोटो त्याने चाहत्यांबरोबर शेअर करत साधं पण सुंदर असं कॅप्शन दिलं आहे. “तू माझ्या आयुष्यातील सर्वात मोठी भेट आहेस. लग्नाच्या पहिल्या वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा अक्षया!”, असं लिहीत त्याने अक्षयाला लग्नाच्या पहिल्या वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या.
ही पोस्ट सोशल मीडियावर बरीच व्हायरल होत आहे. नेटकऱ्यांसह कलाकारांनीही त्यांना लाईक व कमेंट करत त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव केला आहे. अभिनेत्री अश्विनी महांगडेसह दिप्ती केतकर, अभिनेता अभिजित खांडकेकर यांनीही कमेंट करत या दोघांना शुभेच्छा दिल्या.
अक्षया देवधर व हार्दिक जोशी या जोडीने ‘तुझ्यात जीव रंगला’ या मालिकेतून सगळ्यांची मनं जिंकली. या मालिकेतील अंजली बाई व राणा दा यांच्या जोडीला प्रेक्षकांनी डोक्यावर घेतलं होतं. मालिकेच्या शुटिंगदरम्यान हे दोघं जवळपास ५ वर्षे एकत्र होते. त्यामुळे त्यांच्यात बरीच चांगली घनिष्ठ मैत्री झाली. मालिका संपल्यानंतर या दोघांनी लग्नाचा विचार केला. त्यानंतर मालिकेत हीट ठरलेली ही जोडी खऱ्या आयुष्यातही एकत्र आली. अक्षया व हार्दिकने २ डिसेंबर २०२२ला लग्नगाठ बांधली. त्यांच्या लग्नाचे फोटो सोशल मीडियावर बरेच व्हायरल झाले होते.