छोट्या पडदयावरील ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ या लोकप्रिय कार्यक्रमाने सर्वांचीच मनं जिंकली आहेत. या कार्यक्रमातील प्रत्येक पात्र आता प्रेक्षकांच्या आवडीचे झाले आहेत. आपल्या विनोदाच्या अनोख्या शैलीने या कार्यक्रमातील प्रत्येक कलाकाराने प्रेक्षकांच्या मनात स्वत:ची जागा निर्माण केली आहे. या कार्यक्रमातील अभिनेत्री शिवली परबने ‘कल्याणची चुलबुली’ अशी स्वत:ची वेगळी ओळख निर्माण करत प्रेक्षकांच्या मनावर राज्य केलं आहे. शिवाली तिच्या विनोदामुळे चर्चेत असते च पण ती तिच्या मनमोहक फोटोंमुळेदेखील चांगलीच चर्चेत राहते. सोशल मीडियावर अनेक फोटो व व्हिडीओ शेअर करत ती चाहत्यांच्या संपर्कात राहत असते. (Shivali Parab Shared Video On Instagram)
अशातच शिवालीने नुकताच तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटद्वारे एक व्हिडीओ शेअर केला आहे. ज्याची सर्वत्र चर्चा सुरू आहे. नुकतीच तिने एका कार्यक्रमाला हजेरी लावली होती. यावेळी शिवालीची हिंदीसह मराठी मनोरंजन विश्व गाजवणाऱ्या मराठमोळ्या अभिनेता रितेश देशमुख बरोबर भेट झाली. या भेटीची खास झलक तिने चाहत्यांबरोबर शेअर केली आहे. यात तिच्याबरोबर सहकलाकार समीर चौघुले, प्रसाद ओक यांसह सचिन मोटे व सचिन गोस्वामी हेदेखील या व्हिडीओमध्ये दिसत आहे.
शिवाली ही रितेश देशमुख यांची खूप मोठी चाहती असून त्यांना भेटल्यानंतर तिला अत्यानंद झाल्याचे या व्हिडओत दिसत आहे. रितेशला भेटताच क्षणी तिने त्याला घट्ट मिठी मारत त्याच्याबरोबर अनेक फोटोदेखील काढले. “आपल्या कामाची पोचपावती आपल्या आवडत्या कलाकाराकडून मिळणं यापेक्षा वेगळा आनंद नाही.” असं कॅप्शन लिहीत तिने हा व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केला आहे. त्याचबरोबर या व्हिडीओखाली शिवालीने “वेड तुझा” असं म्हणत रितेशच्या नावाचा उल्लेखदेखील केला आहे.
दरम्यान शिवालीने शेअर केलेल्या या व्हिडीओला चाहत्यांनी अनेक लाईक्स व कमेंट्स करत चांगलाच प्रतिसाद दिला आहे. त्याचबरोबर अनेक चाहत्यांनी तिच्या या व्हिडीओखाली “खूप छान, अशीच प्रगती कर, तुझा फार हेवा वाटतो, किती भाग्यवान आहेस तू?, अभिनंदन, शुभेच्छा” अशा अनेक कमेंट्स करत तिच्या या व्हिडीओला चांगलीच पसंती दर्शवली आहे.