विनोदी अभिनेता भाऊ कदम याने आजवर त्याच्या विनोदी अभिनयशैलीने प्रेक्षकांच्या मनावर स्वतःच असं स्थान निर्माण केलं आहे. कायम साऱ्यांना खळखळवून हसवणाऱ्या या विनोदवीराचं सर्वत्र तोंडभरून कौतुकही केलं जातं. मात्र या विनोदवीरालाही एका मुलाखतीदरम्यान अश्रू अनावर झाले. कानाला खडा या कार्यक्रमात भाऊ कदमने हजेरी लावली होती. यावेळी कोणती अशी गोष्ट आहे ज्यामुळे तू कानाला खडा लावशील असा प्रश्न त्याला विचारला असता, या प्रश्नाचं उत्तर देत भाऊने वडिलांची आठवण काढली आणि तो भावुक झालेला पाहायला मिळाला. (Bhau Kadam Emotional)
भाऊने कानाला खडा कोणत्या गोष्टीसाठी लावला याबद्दल बोलताना तो म्हणाला, “जेव्हा माझे वडील अचानक गेले, त्यावेळी सगळी जबाबदारी आमच्यावर आली, संपूर्ण घर सांभाळायचं वगैरे सगळ्याच गोष्टी होत्या. आज मला त्यांची खूप आठवण येते पण आज ते नाही आहेत. आज माझ्याकडे सगळं आहे, माझं कुटुंब आहे, माझी आई आहे, पण वडील नाही आहेत. आई असताना तिचं महत्व कळतंच आहे, पण वडील नसण्याची जाणवणारी जी पोकळी आहे ती कधीच भरून निघणार नाही आहे. लहानपणी त्यांनी मला मारलं की मला वाईट वाटायचं, हे मलाचं का बोलतात, मलाचं का मारतात असं वाटायचं, पण आज त्याचा अर्थ मला कळतोय.
यापुढे बोलताना भाऊ म्हणाला, “स्वतः बाप झाल्यानंतर तुम्ही ज्या अपेक्षा मुलांकडून ठेवता, त्यांनी अभ्यास करावा, खूप शिकावं, समाजात चांगलं वागावं तीच अपेक्षा माझ्या वडिलांची होती. आज सगळं आहे, नाव आहे, सगळी लोक माझं कौतुक करतात, मात्र ते कौतुक बघायला बाबा नाहीत. पण आता जेव्हा मी कधी इतर आजोबा बघतो, नातू नातवंड बघतो, कुटुंब बघतो तेव्हा मला वडिलांची आठवण येते”, असं म्हणून भाऊंच्या डोळ्यात आसवं आली. पुढे तो म्हणाला, “जेव्हा एखाद बक्षीस मिळतं, कोणी कौतुक करतं, ते जर माझ्या वडिलांनी पाहिलं असतं तर त्यांना खूप बरं वाटलं असतं. मला ते मारायचे पण मला असं पुढे गेलेलं पाहूनही त्यांना खूप बरं वाटलं असतं.”
“मी आता कानाला खडा लावतो की, मी तेव्हा वडिलांना समजू शकलो नाही, खरतर समजून घ्यायला हवं होतं. आज ते बरोबर असते तर खूप सुधारणा करता आली असती. त्यांचं हे स्वप्न मी पूर्ण नाही करू शकलो ही खंत आहे. आणि आज बाप झाल्यावर बाप काय असतो हे मला बाप गेल्यावर कळलं. वडिलांचा कधी मित्र झालो नाही, ही त्रुटी मात्र मनात कायम राहील.”