ज्येष्ठ अभिनेते अशोक सराफ यांना महाराष्ट्र भूषण पुरस्कार जाहीर झाला आहे. मनोरंजन सृष्टीतील त्यांच्या या योगदानासाठी त्यांना यंदाचा महाराष्ट्र भूषण पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे. २०२३चा हा मानाचा पुरस्कार अशोक सराफ यांना देण्याची घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली आहे. तसेच मुख्यमंत्र्यांनी अशोक सराफ यांच्याशी बोलून महाराष्ट्र भूषण पुरस्कार मिळाल्यानिमित त्यांचे अभिनंदनही केले असल्याचं समोर आलं. यानंतर आता थेट अशोक सराफ यांनी पुरस्कार जाहीर झाल्यानंतर त्यांच्या भावना व्यक्त केल्या आहेत. (Ashok Saraf On Maharashtra Bhushan Purskar)
‘महाराष्ट्र टाइम्स’ला अशोक सराफ यांनी नुकतीच याबाबतची प्रतिक्रिया दिली. यावेळी पुरस्कार मिळण्याबाबत बोलताना अशोक सराफ म्हणाले, “मला कल्पना नव्हती मला हा पुरस्कार मिळेल. मी कुठेतरी चांगलं काम करत आहे आणि तुम्हाला सर्वांना ते आवडत आहे, ही माझ्यादृष्टीने अतिशय आनंदाची गोष्ट आहे. हा पुरस्कार मला मिळाला, माझी आतापर्यंतची धडपड सार्थकी लागल्याचं वाटतंय. मी काय करतोय हे मला आवडण्यापेक्षा, प्रेक्षकांना कसं आवडेल याचा मी कायम विचार केला. प्रेक्षक आहेत तर मी आहे. त्यामुळे मी केलेलं काम लोकांना कसं आवडेल याचा मी नेहमी विचार केला आणि त्याप्रमाणे मी काम करत आलो” असं ते म्हणाले.
पुढे सहकलाकारांना याच क्रेडिट देत अशोक सराफ म्हणाले की, “माझ्या या करिअरमधील संपूर्ण प्रवासात ज्या-ज्या व्यक्तीने माझ्याबरोबर काम केलं, त्या प्रत्येकाचा सहभाग यात आहे. अभिनय एका माणसाकडून होत नसतो, त्याच्याबरोबर सहकारदेखील तितकेच महत्त्वाचे असतात. त्यांनीही चांगलं केलं, तर संपूर्ण काम चांगलं होतं. माझ्या सहकलाकारांनी मला चांगली साथ दिली, त्यामुळेच हे शक्य झालं. त्यामुळे मी सर्वांचे आभार मानतो. सर्वांचं श्रेय माझ्या या पुरस्कारासाठी आहे. निवेदिता माझ्यामागे कायम खंबीरपणे उभी राहिली. त्यामुळे घर बाजूला ठेवून मी माझ्या कामाकडे लक्ष देऊ शकलो”.
यापुढे ते म्हणाले, “करिअरमध्ये कधी इतका मोठा पल्ला गाठू अशी कल्पना नव्हती. पण मी काम करत गेलो आणि लोकांना ते आवडतं गेलं. लोकांना आपलं काम आवडतं हे समजल्यावर अधिक चोखंदळपणे काम करावं लागलं. त्यावर विचार करावा लागला की लोकांना आवडेल तसंच काम करावं लागलं” असंही ते म्हणाले.