अभिनेता पुष्कर जोग हा आरक्षणावरुन होणाऱ्या सर्वेपद्धतीवर वादग्रस्त विधान केल्यामुळे चर्चेत आला आहे. पुष्करने सर्वे करायला आलेल्या बीएमसी कर्मचाऱ्याबाबत केलेली पोस्ट वादाच्या भोवऱ्यात अडकली आहे. मराठा आरक्षणासाठी गेल्या काही महिन्यांपासून लढा उभारणारे मनोज जरांगे पाटील चर्चेत आले. दरम्यान, मराठा समाजाच्या आरक्षणाबाबतच्या सर्व मागण्या राज्य सरकारनं मान्य केल्या आहेत. यादरम्यान सध्या राज्यात सर्वत्र आरक्षणावरुन सर्वे सुरु असल्याचं पाहायला मिळत आहे. (manoj jarange patil on pushkar jog)
मात्र आरक्षणावरुन सर्वे करणाऱ्या बीएमसी कर्मचाऱ्याबाबत अभिनेता पुष्कर जोगने केलेली पोस्ट वादाच्या भोवऱ्यात अडकली आहे. पुष्करने “काल बीएमसीचे काही कर्मचारी माझ्या घरी आले आणि मला सर्व्हे करतोय अशी माहिती देऊन माझी जात विचारत होते. त्या कर्मचारी जर बाईमाणूस नसत्या, तर २ लाथा नक्कीच मारल्या असत्या… कृपया करुन मला हा प्रश्न पुन्हा विचारू नका नाहीतर जोग बोलणार नाहीत डायरेक्ट कानाखाली मारतील” अशी पोस्ट शेअर केली होती. या पोस्टवरुन बीएमसी कर्मचाऱ्यांनी संताप व्यक्त करत कार्यवाहीची घोषणा केली. त्यावर अभिनेत्याने पोस्ट डिलीट करत दिलगिरीही व्यक्त केली.
अभिनेत्याची ही वादग्रस्त पोस्ट पाहता सिनेइंडस्ट्रीतील अनेक कलाकार मंडळींनी, तसेच राजकीय नेतेमंडळींनी रोष व्यक्त केलेला पाहायला मिळाला. दरम्यान मराठा आरक्षणाचे सर्वेसवा मनोज जरांगे पाटील यांनीही पुष्करच्या पोस्टवर आपलं मत व्यक्त केल्याचं समोर आलं आहे. त्यांच्याकडे संस्कार नाहीत असं म्हणत त्यांनी पुष्करबाबत रोष व्यक्त केला.
मनोज जरांगे पाटील या प्रकरणावरुन माध्यमांसह बोलताना म्हणाले, “त्यांच्याकडे जायलाच नाही पाहिजे. त्यांना याबाबत काही विचारण्याची गरज नव्हती. त्याच्याकडे दुर्लक्ष करायला हवं. त्यांच्याकडे एवढे संस्कार नाही आहेत. आरक्षणाबाबत चौकशी करण्यासाठी शासनाने एक समिती पाठवली आहे आणि तिचा अवमान करणे चूक आहे. पण माझं एक मत असं आहे की, त्यांच्याकडे जाताच कशाला, त्यांना कुठे पैशांची कमी आहे, सगळ्या दुनियेचे पैसे आहेत त्यांच्याकडे” असं म्हणत त्यांनी प्रतिक्रिया दिली.