टीव्हीवरील लोकप्रिय हिंदी विनोदी मालिका ‘तारक मेहता का उल्टा चष्मा’ या मालिकेमध्ये मिसेस रोशन सिंग सोडीची भूमिका साकारणारी अभिनेत्री जेनिफर मिस्त्रीने शोचा निर्माता असित कुमार मोदीविरोधातील लैंगिक छळाचा खटला जिंकला आहे. या प्रकरणात जेनिफरचं थकबाकी असलेलं मानधन व नुकसान भरपाई म्हणून पाच लाख रुपये देण्याचे आदेश स्थानिक समितीने दिले आहेत. तिचं बाकी मानधन २५-३० लाख रुपये असावं असं तिने सांगितलं. पण ४० दिवसांपूर्वी या खटल्याचा निकाल लागला असून अद्याप पैसे मिळाले नसल्याचं जेनिफरने म्हटलं आहे.
यासंबंधीत जेनिफरने इन्स्टाग्रामवर पहिली पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टमध्ये तिने असं म्हटलं आहे की, “माझ्या लैंगिक छळाच्या प्रकरणात मला विजय मिळाल्यानिमित्त मी आनंद व्यक्त करते. या प्रकरणात असित मोदी दोषी सिद्ध झाला आहे, त्यामुळे मी देवाची आभारी आहे. तसेच माझे वकील, माझा नवरा व माझे काही जवळच्या मित्रांना मी धन्यवाद म्हणते. पण माझी लढाई अजून संपलेली नाही. फक्त असित मोदींना माझी देय रक्कम जी फेब्रुवारीमध्ये निकाल देऊन ४० दिवसांनंतरही त्यांनी अद्याप भरलेली नाही. तसेच गेल्या १ वर्षापासून त्यांनी माझे पेमेंट रोखून ठेवलेले आहे”.
“या सर्व प्रकरणात मी माझ्या १० वर्षांच्या मुलीला एकटीला घरी सोडले होते, या काळात मी माझी नोकरी, मित्र याचबरोबर माझी प्रतिष्ठाही गमावली. तसेच या केसचा खर्च, वैद्यकीय खर्च या साऱ्याचा माझ्यावर मानसिक आघात झाला. गेल्या वर्षभरात माझ्यावर झालेल्या मानसिक आघाताचं काय? गुन्हेगार निर्दोष असल्याचं भासवून मोकळे फिरत आहेत. सरकारी अधिकाऱ्यांच्या या निकालामुळे मी खोटा खटला दाखल केला नव्हता, मी वूमन कार्ड खेळत नव्हते व मी प्रसिद्धीसाठी बोलले नव्हते हेच सिद्ध झालं आहे.” असं म्हटलं आहे.
तसेच यापुढे तिने “मी जे खरं आहे तेच सांगितलं. पण मला योग्य न्याय मिळाला आहे, असं मला वाटत नाही,” असं म्हटलं आहे. त्याचबरोबर “माझ्यासारख्या जाणत्या महिलेला न्यायासाठी लढणे इतके अवघड असेल तर सामान्य महिलांच्या बाबतीत काय होत असेल?” असं म्हणत प्रश्न उपस्थित केला आहे.