‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ या विनोदी कार्यक्रमाने आजवर प्रेक्षकांच्या मनात घर केलं आहे. या कार्यक्रमातही प्रत्येक कलाकाराने प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवलं आहे. अशातच ‘कोळीवाड्याची रेखा’ म्हणून ओळखली जाणारी अभिनेत्री वनिता खरातने तिचा असा चाहतावर्ग निर्माण केला. वनिताने गेल्या वर्षी सुमित लोंढेसह लगीनगाठ बांधली. त्यांच्या लग्नाच्या फोटोनी तर सोशल मीडियावर अक्षरशः धुमाकूळ घातला होता. वनिता व सुमित नेहमीच त्यांचे फोटोस सोशल मीडियावरून शेअर करताना दिसतात. (Hemangi Kavi On Vanita Kharat Husband)
लग्नानंतर ही जोडी नेहमीच मोठ्या उत्साहाने सण साजरे करताना दिसते. अशातच सुमित व वनिताने नुकताच त्यांचा लग्नानंतरचा पहिला दसरा साजरा केला आहे. यावेळी त्यांनी पारंपरिक अंदाजात काढलेले फोटो सोशल मीडियावरून शेअर केले. दसऱ्याच्या शुभेच्छा देत त्यांनी हे फोटो शेअर केले आहेत. या फोटोमध्ये वनिताने काळ्या काठांची आणि केशरी रंगाची साडी नेसली आहे, तसेच नाकात नथ व गळ्यात दागिने घालून ती खूपचं सुंदर दिसतेय, तर सुमितने जांभळ्या रंगाचा कुर्ता घातला होता. वनिता या फोटोमध्ये गोड हसताना दिसतेय तर सुमित शांतपणे तिच्या बाजूला उभा आहे.
या त्यांच्या फोटोंवर अनेक चाहत्यांनी कमेंट करत त्यांचं कौतुक केलं आहे. दरम्यान या फोटोवरील एका अभिनेत्रींच्या कमेंटने साऱ्यांचं लक्ष वेधून घेतलं आहे. अभिनेत्री हेमांगी कवीने कमेंट करत म्हटलं आहे की, “हे नवरे लोक फोटोत हसत का नाहीत, कुणास ठाऊक? आमचा माणूस पण तसाच! बाकी गोड दिसताय तुम्ही,”. हेमांगीच्या कमेंटवर प्रतिक्रिया देत वनिता म्हणाली, “त्यांना त्याच्यात swag वाटत असावा.” हेमांगीच्या या कमेंटला सुमितने उत्तर देत म्हटलं आहे, ‘मी हसतोय, पण मनातल्या मनात’. त्यावर हेमांगी म्हणाली, “हेच उत्तर आमच्या माणसाचं पण! म्हणजे तद्दन खोटंय हे.” त्यावर सुमित पुन्हा कमेंट करत म्हणाला, “पुढच्या वेळी चांगली स्माईल देणार”.

वनिता व सुमितच्या या फोटोवर अनेक कलाकार मंडळींनी कमेंट करत त्यांचं कौतुक केलं आहे. तर अनेक चाहत्यांनी त्यांच्या या फोटोवर लाइक्स व कमेंट्सचा वर्षाव केला आहे. तसेच फोटोत सुमित व वनिता खूप छान दिसत आहेत, अशा कमेंट्स नेटकऱ्यांनी केल्या आहेत.