प्रत्येक कलाकारांच्या आयुष्यात संघर्ष हा असतोच. बऱ्याच कलाकारांना त्यांच्या कुटुंबियांना संघर्षातून जावं लागतं. मात्र जिद्दीने, मेहनतीने ही कलाकार मंडळी त्यांचं नाव मोठं करतात. अशीच एका मराठमोळ्या अभिनेत्रीची संघर्षकथा समोर आली आहे. आजवर आपल्या सुंदरतेने, मोहकतेने व अभिनयाने प्रेक्षकांना मोहिनी घालणारी ही अभिनेत्री आहे प्रार्थना बेहरे. प्रार्थनाने नुकत्याच तिच्या युट्युब चॅनेलवरून तिच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल भाष्य केलं आहे. यावेळी तिने तिचा दागिन्यांच्या नामांकित कंपनीची ब्रॅण्ड अॅम्बेसेडर होण्याचा प्रवास सांगितला. यावेळी तिने एक आठवणही शेअर केली. (Prarthana Behere Struggle Story)
लहानपणीची आठवण शेअर करत प्रार्थना म्हणाली की, “माझे बाबा टेक्सटाईल इंजिनीअर म्हणून एका मिलमध्ये काम करायचे. मला आठवतंय मी तेव्हा तिसरी-चौथीत होते. आणि एके दिवशी अचानक आम्हाला समजलं की, सगळ्या मिल्स बंद होऊन बाबांची नोकरी गेली आहे. त्यानंतर पुढची दोन वर्ष त्यांच्याकडे नोकरी नव्हती. तेव्हा बाबांनी मार्केटिंगमध्ये त्यांचं करिअर केलं आणि व्यवसाय सुरू केला. पण, ती दोन वर्ष आमच्या आयुष्यातील सर्वात मोठा संघर्षाचा काळ होता.”
प्रार्थना पुढे म्हणाली, “बाबा नोकरी करत नसल्याने आईला नोकरी करणं भाग होतं. त्यामुळे माझी आई एका इंटरव्ह्यूला गेली. नामांकित दागिन्यांच्या दुकानात ती नोकरीसाठी गेली होती. सोनाराच्या दुकानांमध्ये ज्या मुली जॉब करतात त्या कामासाठी आई गेली होती. त्यावेळी मुलाखत घेऊन झाल्यानंतर माझ्या आईला रिजेक्ट करण्यात आलं होतं. आई घरी आल्यावर आम्ही तिला विचारलं, ‘काय झालं आई जॉबचं?’ तेव्हा तिने मला घडलेला प्रकार सांगितला. “तुम्ही दिसायला खूपच साध्या आहात. तुमच्या कानात, गळ्यात काहीच सोनं नाही. तुम्हाला जर इथे नोकरी करायची असेल तर तुम्ही इथून काही सोनं विकत घ्या आणि स्वतःला सुंदर बनवा” असं माझ्या आईला तेव्हा सांगण्यात आलं होतं. मी लहान असूनही माझ्या ती गोष्ट कायम मनात राहिली होती.तेव्हा आई असं म्हणाली की, “आता सोनं घेऊन नोकरी करण्यापेक्षा आता आपल्याला पैशांची अधिक गरज आहे.”
“आईने सांगितलेली घटना ऐकल्यावर मी त्यादिवशी मनात ठरवलं की, आयुष्यात खूप काहीतरी मोठं करायचं जेणेकरून माझ्या आई-बाबांना कुठेच रिजेक्शन मिळणार नाही… त्यांना जे हवंय ते सगळं मी त्यांना मिळवून देणार. पुढे, एके दिवशी मला अचानक फोन आला आणि एका नामांकित दागिन्यांच्या कंपनीकडून ब्रॅण्ड अॅम्बेसेडरसाठी विचारणा करण्यात आली होती. तेव्हा मी लगेच माझ्या आईला फोन करून ही गोष्ट सांगितली होती. तिला प्रचंड आनंद झाला होता. आपल्या मनात जिद्द असेल तर आपण कोणतीही गोष्ट करू शकतो याची जाणीव मला त्या क्षणाला झाली.” असं प्रार्थनाने सांगितलं.