‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ या कार्यक्रमाचे लाखो चाहते दिवाने आहेत. संबंध महाराष्ट्रात व महाराष्ट्राबाहेरही या कार्यक्रमाचा स्वतःचा असा प्रेक्षकवर्ग निर्माण केला आहे. आजवर या कार्यक्रमातील प्रत्येक कलाकाराने प्रेक्षकांच्या मनावर स्वतःचा असा ताबा मिळवला आहे. या कार्यक्रमातील कलाकारांचा एक विनोदी चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस येण्यास सज्ज होत आहे. अभिनेता, दिग्दर्शक प्रसाद खांडेकर व अभिनेत्री नम्रता संभेराव अभिनीत ‘एकदा येऊन तर बघा’ हा चित्रपट येत्या ८ डिसेंबरला प्रेक्षकांना खळखळवून हसवायला सज्ज होत आहे. (Johny Lever With Namrata sambherao and samir choughule)
नुकताच ‘एकदा येऊन तर बघा’ या चित्रपटाचा प्रीमियर लॉंच सोहळा दणक्यात पार पडला. चित्रपटाच्या प्रीमियरला चित्रपटातील कलाकारांनी उपस्थिती लावून या सोहळ्याची रंगत वाढविली. दरम्यान चित्रपटातील कलाकारांना शुभेच्छा देण्यासाठी हास्यजत्रेतील इतर कलाकारही उपस्थित होते. समीर चौघुले, शिवाली परब, इशा डे, वनिता खरात, रोहित माने यांची उपस्थिती पाहायला मिळाली.
दरम्यान या सोहळ्याला चित्रपसृष्टीतील काही दिग्गज कलाकार मंडळींना ही आमंत्रित करण्यात आलं होतं. आपल्या विनोदी अभिनयाने सर्वांना लोटपोट हसवणारे अभिनेते जॉनी लीवर यांनी सर्वांनाच हसवले आहे. आतापर्यंत त्यांनी अनेक दर्जेदार चित्रपटांमध्ये काम केले आहे. बॉलिवूडचे कॉमेडी किंग अशी ओळख असलेले अभिनेते जॉनी लीवर यांनी ‘एकदा येऊन तर बघा’ या चित्रपटाच्या प्रीमियरला हजेरी लावली होती.
जॉनी लीवर यांची एंट्री होताच प्रसाद खांडेकर याने त्यांना मिठी मारली, त्यांनतर नम्रताने त्यांच्या पाया पडत त्यांचा आशीर्वाद घेतला यावर जॉनी लीवर यांनी नम्रताला जवळ घेत तिला कौतुकाची थाप दिली. यानंतर पुढे फोटो देण्यासाठी जात असताना जॉनी लीवर समीर चौघुलेला आवाज देताना दिसतात. यांत ते ‘ओ भाऊ, अरे कुठे चाललात तुम्ही’ असं म्हणत समीरला आवाज देतात. आणि त्याच्याजवळ जात त्याला घट्ट मिठी मारताना दिसतात. त्यानंतर एकत्र ग्रुप फोटो काढतानाही ते समीरला आग्रह करताना दिसतात.