सध्या सर्वत्र ‘एकदा येऊन तर बघा’ या चित्रपटाची चर्चा सुरू आहे. प्रसाद खांडेकरने लिहलेला व दिग्दर्शित केलेला हा त्याचा पहिलाच चित्रपट असून यात सयाजी शिंदे, भाऊ कदम, विशाखा सुभेदार, गिरीश कुलकर्णी, तेजस्विनी पंडित, पंढरीनाथ कांबळे, प्रसाद खांडेकर, नम्रता संभेराव, ओंकार भोजने, राजेंद्र शिसतकर, वनिता खरात, शशिकांत केरकर, रोहित माने, सुशील इनामदार आदि कलाकारांच्या प्रमुख भूमिका आहेत. येत्या ८ डिसेंबर रोजी हा चित्रपट प्रदर्शित होणार असून नुकताच या चित्रपटाचा प्रिमियर सोहळा पार पडला. या सोहळ्याला मराठी चित्रपटसृष्टीमधील अनेक कलाकारांनी हजेरी लावली होती. यात प्रसाद जवादे व अमृता देशमुख ही जोडीदेखील या प्रिमियरला उपस्थित होती. (Prasad Jawade And Amruta Deshmukh Interview)
यावेळी ‘इट्स मज्जा’बरोबर या जोडीने संवाद साधला. तेव्हा प्रसाद-अमृताची लग्नानंतरची ही पहिलीच ‘मुव्ही डेट’ असल्याचेही त्यांनी सांगितले. यावेळी अमृता “या चित्रपटाच्या निमित्ताने आम्ही लग्नानंतर पाहिल्यांदाच डेटवर आलो आहोत. त्यामुळे आम्ही खूप आनंदी आहोत. प्रसादला नेहमीच मला डेटवर घेऊन जायला आवडतं. मात्र मीच कंटाळा करते. आणि त्यात गेले काही दिवस माझी तब्येत बरी नसल्यामुळे आम्ही कुठे बाहेर गेलो नव्हतो. अशातच या चित्रपटाच्या निमित्ताने बाहेर पडता आलं. त्यामुळे मी खूप आनंदी आहे.” असं तिने म्हटलं.
यापुढे प्रसाद-अमृता हे एकत्र मोठ्या पडद्यावर कधी दिसणार? या प्रश्नाचे उत्तर देताना ती असं म्हणाली की, “आम्ही दोघांनी एकत्र मोठ्या पडदयावर काम करावी अशी माझीही इच्छा आहे. नवरा-बायको म्हणून नाहीतर कलाकार म्हणून एकत्र काम करण्यासाठी आम्ही दोघेही उत्सुक आहोत. एखाद्या नवीन प्रोजेक्टमध्ये आम्ही दोघे एकत्र काम करण्यासाठी आम्ही कायमचं आतुर आहोत आणि मला आशा आहे की, लवकरच आम्ही एकत्र मोठ्या पडद्यावर दिसू.”
दरम्यान, या प्रिमियर सोहळ्याला जॉनी लिवर यांनीदेखील हजेरी लावली होती. त्याचबरोबर समीर चौघुले, निखिल बने, गौरव मोरे, शिवाली परब, वनिता खरात, ईशा डे, प्रियदर्शिनी इंदलकर, प्रसाद ओक यांसह सचिन मोटे व सचिन गोस्वामी अशा हास्यजत्रेतील सर्व कलाकार प्रसादला शुभेच्छा देण्यासाठी आले होते. त्याचबरोबर प्रसाद खांडेकर व नम्रता संभेराव यांचे कुटुंबियही या सोहळ्याला उपस्थित होते.