‘चला हवा येऊ द्या’ या कार्यक्रमाने आजवर प्रेक्षकांचं बरंच मनोरंजन केलं आहे. आजवर या विनोदी कार्यक्रमातील सर्वच कलाकारांनी प्रेक्षकांना खळखळवून हसवलं. कार्यक्रमातील सर्वच कलाकारांनी स्वतःचा असा चाहतावर्ग तयार केला आहे. अशातच या कार्यक्रमातून घराघरांत पोहोचलेला अभिनेता भाऊ कदम याने प्रेक्षकांना पोट धरून हसवलं. काही दिवसांपूर्वी भाऊ कदम यांचा अशोक सराफ यांची भेट घेतानाचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. त्याच्या या भेटीत मामांनी किमान भाऊंना बसायला सांगायला हवं होतं, हे असं का वागले अशा अनेक प्रतिक्रिया देत मामांच्या वागण्यावर नेटकऱ्यांनी नाराजी दर्शवली होती. या सर्व प्रकरणावर आता भाऊ कदम यांनी मौन सोडत नेटकऱ्यांना सुनावलं आहे. (Bhau Kadam On Ashok Saraf)
‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइन’ला दिलेल्या मुलाखतीत भाऊ यांनी मामांबरोबरच्या त्या व्हिडिओबद्दल भाष्य केलं आहे, भाऊ म्हणाले, “त्यांना फ्रेम बघून वाटलं असेल काही, पण प्रसंग असा घडला होता पहिला की माझा प्रयोग होता आणि अशोक मामा आले होते. माझ्या प्रयोगानंतर त्यांचा प्रयोग होता. मी मेकअप काढत होतो आणि मला एकाने सांगितलं की अरे मामा आलेत. मला जायचं होतं ‘चला हवा येऊ द्या’च्या रिहर्सलला. मी म्हणालो पटकन भेटून येतो.”
“मी घाईघाईत गेलो. मी पाया पडलो, ते बसले होते, मी म्हणालो कसे आहात ना, बरं चाललंय ना? म्हणाले हो. सोमवार मंगळवार रिहर्सल आहे कसं करता तुम्ही हे, एवढीच चर्चा झाली. मामांशी गप्पा मारायला नव्हतो गेलो, मलाच घाई होती. हा प्रसंग आहे आणि मी निघालो पाया पडून. पण लोकांना काय वाटलं हे मला कळलंच नाही खरं तर. आणि त्यांच्यासमोर कोण बसू शकतं?”
पुढे भाऊ म्हणाले, ‘ते एक खूप मोठे कलाकार आहे, महान कलाकार आहेत. त्यांना बघत आम्ही शिकलो, त्यांनी इतिहास घडवलाय. ते आमच्यासाठी देव आहेत. त्यांच्यासमोर बसणं हे फारच आहे. कुणालाच इच्छा होणार नाही. जशी मला झाली नाही. हा तेच जर घरी असतो त्यांच्या तर त्यांनी मला नक्की बसवलं असतं, चहापाणी दिलं असतं. हे मी खात्रीने सांगतो. मी घाईत होतो, थिएटरला होतो, प्रयोग होते लोकांची गर्दी होती. पटकन भेटून मी गेलो. कृपया असं काही बोलू नका, खरं विचारा तरी एकदा, मग तुम्ही रिअॅक्ट व्हा. कृपया असं करू नका. गैरसमज होतो आणि मामांबद्दल खूप आदर आहे . सॉरी पण असं करू नका.’ भाऊ कदम यांनी नेटकऱ्यांना ही विनंती केली.