‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ या लोकप्रिय कार्यक्रमातून प्रकाशझोतात आलेला अभिनेता म्हणजे पृथ्वीक प्रताप. पृथ्वीकने आपल्या विनोदी अभिनयाच्या जोरावर प्रेक्षकांची मने जिंकली आहे. हास्यजत्रेमुळे अभिनेता सध्या लोकप्रियतेच्या शिखरावर पोहोचला असला. तरी, त्याला इथपर्यंत पोहोचण्यासाठी बराच संघर्ष करावा लागला. एकांकिका, मालिका, चित्रपट व वेबसीरिजमधून त्याने आपल्या अभिनयाचा डंका वाजवला आहे. अभिनयाबरोबर सोशल मीडियावरही बराच सक्रिय असलेल्या पृथ्वीकची एक पोस्ट सध्या चर्चेत आली आहे. (Prithvik Pratap post for Aatmapamphlet Movie)
पृथ्वीकने नुकतंच परेश मोकाशी लिखित ‘आत्मपॅम्फ्लेट’ चित्रपट पाहिला. यावेळी चित्रपटाचे कौतुक करत संपूर्ण टीमचे अभिनंदन केले. शिवाय, फेसबुकवर एक पोस्ट शेअर करत त्याने सर्वांचे लक्ष वेधले आहे. पृथ्वीक या पोस्टमध्ये म्हणाला, “तर भावांनो, जगातल्या अनेक धर्मग्रंथांनी आपल्याला शांततेचं, अहिंसेचं आणि एकतेचं आवाहनपर सल्ला किंवा शिकवण दिलेली आहे. पण सांगितलेलं, लिहून ठेवलेलं आपण जसंच्या तसं एकदम चांगल्या पद्धतीने फॉलो केलं तर आपण ‘बुद्धीजीवी मनुष्य प्राणी’ कसले? मुळातच फार पूर्वीपासून वर्गीकरण हा आपला अत्यंत आवडता छंद असल्यामुळे आपण सहसा शांत बसत नाही. मग फक्त होमो असून चालत नाही, तर इरेक्टस की सेपियन हेसुद्धा ठरवावं लागतं. अर्थात उत्क्रांतीसाठी ते महत्त्वाचेच. पण बऱ्याच वर्गीकरणात आपली प्रगती कमी आणि परागती जास्त होते, हे ठरवूनसुद्धा आपल्या लक्षात येत नाही.”
हे देखील वाचा – “चाहत्यांची नजर लागली अन्…”, व्हिडीओ शेअर करत ‘बिग बॉस’ फेम मराठी अभिनेत्रीने सांगितली व्यथा, म्हणाली, “मुलींच हे दुःख…”
पुढे तो म्हणाला, “तर भावांनो सांगायचा मुद्दा असा की, विज्ञानानुसार मानवी मेंदू साधारण १८ महिन्यांनी पूर्ण रूप धारण करतो. त्यानंतर कुठल्याही एक्सट्रा न्यूरॉन्स किंवा सेल्सची त्यात भर पडत नाही. म्हणजे मेंदू तयार व्हायला सुरुवातीचे दीड वर्षे आणि ते पूर्ण व्हायला साधारण २५ वर्षे, असं हे एकूण गणित आहे. पण सगळी गंमत इथेच आहे. दीड वर्षात मेंदूने पूर्ण रूप धारण केल्यानंतर पुढच्या २५ वर्षात ‘समज’ येण्याआधी ‘समाज’ येतो. आणि हा समाज आपल्या आयुष्यातील शिशु, बालक, कुमार, किशोर, तरुण, प्रौढ, वृद्ध हे टप्पे असे काय हेलकावून काढतो की, जगातल्या अनेक धर्मग्रंथांनी आपल्याला दिलेली ‘शांततेची, अहिंसेची आणि एकतेची’ शिकवण आपण क्षणार्धात विसरून जातो. आणि पुन्हा वर्गीकरणाचा खेळ सुरु होतो.”
हे देखील वाचा – लग्नाआधीच मुग्धा वैशंपायनने केली होणाऱ्या पतीची तक्रार, मुलाखतीदरम्यान उघड केलं गुपित, म्हणाली, “अलिकडे तू…”
“कला ही फक्त मनोरंजन करणारी नव्हे तर प्रबोधन करणारी सुद्धा हवी.”, असं म्हणत त्याने चित्रपटाचं आणि चित्रपटाच्या संपूर्ण टीमचं कौतुक केलेलं आहे. पुढे तो म्हणाला, “चित्रपटातील काळ जुना असला तरी विषय समकालीन आहे. आणि तो पोहचवण्यासाठी जी निरागसता हवी, ती लहान मुलांपेक्षा जास्त कोणाकडे असणार? त्यामुळे एका क्युट लव्ह स्टोरीच्या आडून बुद्धीने पांगळ्या झालेल्या समाजाला लेखक-दिग्दर्शक काही टप्प्यांमध्ये योग्य तो पोलिओचा डोस देत राहतात. खरंतर बोलायला, लिहायला आणखी खूप काही आहे. पण फक्त बोलून, ऐकून, वाचून हा सिनेमा कळणार नाही तो खरतर अनुभवावा लागेल.”
हे देखील वाचा – अखेर प्रतीक्षा संपली! सुपरहीट ठरलेल्या ‘झिम्मा’ चित्रपटाचा दुसरा भाग लवकरच प्रदर्शित होणार, व्हिडीओ समोर
पुढे त्याने चाहत्यांना चित्रपट पाहण्याचं आवाहन करताना म्हणाला की, “भावांनो हे आत्मपॅम्फ्लेट ज्यांच्या विवेकाची दारं बंद आहेत. त्यांच्या घरी तर पोहचवलंच पाहिजे. कदाचित एखाद्या धर्मग्रंथातील ‘शांततेची, अहिंसेची आणि एकतेची’ शिकवण जी आपल्याला अजून कळत नाहीये, त्यांच्यासाठी हे छोटसं पॅम्फ्लेट ‘आत्मपॅम्फ्लेट’ समजावून जाईल.”, त्याची ही पोस्ट सध्या व्हायरल होत आहे. तसेच, चित्रपटातील कलाकारांनी कमेंट करत त्याचे कौतुक केले आहे. आशिष बेंडे दिग्दर्शित या चित्रपटात ओम बेंडखळे, प्रांजली श्रीकांत, भीमराव मुडे व केतकी सराफ आदी कलाकारांनी प्रमुख भूमिका साकारली आहे.