मराठी सिनेसृष्टीतील ‘चॉकलेट बॉय’ व ‘रोमॅंटिक हीरो’ म्हणून प्रसिद्ध असलेला अभिनेता म्हणजे स्वप्नील जोशी. स्वप्निलने आजवर अनेक मालिका व चित्रपटांद्वारे प्रेक्षकांचे मनोरंजन केले आहे. विविध कलाकृतींमध्ये लक्षवेधी भूमिका साकारत त्याने प्रेक्षकांची मनं जिंकली आहेत. केवळ रुपेरी पडदा नव्हे, तर ‘समांतर’ या वेबसीरिजमधून स्वप्नीलने ओटीटी विश्वही गाजवले आहे. आपल्या अभिनयाने चर्चेत राहणारा हा अभिनेता आता निर्मात्याच्या भूमिकेतूनही प्रेक्षकांच्या समोर आला आहे.
परेश मोकाशी दिग्दर्शित ‘नाच गं घुमा’ या चित्रपटाद्वारे स्वप्नीलने निर्मिती क्षेत्रात पाऊल ठेवलं आहे. या चित्रपटाला प्रेक्षकांचा तुफान प्रतिसाद मिळत असून प्रेक्षकांमध्ये या चित्रपटाची सध्या चांगलीच चर्चा सुरु आहे. अशातच या चित्रपटाच्या प्रमोशननिमित्ताने ‘नाच गं घुमा’च्या टीमने ‘एबीपी माझा’शी संवाद साधला. या संवादादरम्यान अभिनेत्याने तो आजही आवर्जून घरातली सर्व कामे करत असल्याचे सांगितले.
यावेळी स्वप्नील जोशीने असं म्हटलं की, “मी घरातली सर्वच कामे करतो. मी एकुलता एक असल्यामुळे आईने आधीच सांगितलं होतं की रोज घरातलं एक तरी काम करायचंच, जे मी आजही करतोच. मी आजही केर काढणे, कपबशी धुणे ही कामे करतो. घरात मदतनीस नाहीत का? तर आहेत, दोन आहेत. पण तो एक शिस्तीचा भाग आहे. तुला काम आलं पाहिजे हे आईने आधीच सांगून ठेवलं आहे. तू मुलगा आहेस म्हणून तुला वेगळा न्याय नाही मिळणार”.
यापुढे त्याने असं म्हटलं की, “घरातील मुलींना सांगितले जाणारे काम तूही केलं पाहिजे आणि ते तुलाही करता आलंच पाहिजे ही माझ्या आईची शिकवण आहे. मुलगा-मुलगा हा फरकच नाही. त्यामुळे मी घरातली सगळी कामे करतो. याचा मला अभिमान आहे आणि ती केलीच पाहिजेत”.
दरम्यान, ‘नाच गं घुमा’ या चित्रपटाद्वारे अभिनेता स्वप्नील जोशी निर्मिती क्षेत्रात पाऊल ठेवत आहे. स्वप्नीलसह शर्मिष्ठा राऊत, मधुगंधा कुलकर्णी, परेश मोकाशी, तेजस देसाई व तृप्ती पाटील यांनी देखील या चित्रपटाच्या निर्मितीची धुरा सांभाळली आहे.