सध्या मनोरंजनसृष्टीत ‘अॅनिमल’ या चित्रपटाची चांगलीच क्रेझ पहायला मिळत आहे. हा चित्रपट सध्या बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालत असून या सध्या सर्वत्रच या चित्रपटाची जोरदार चर्चा सुरू आहे. याच चित्रपटाच्या निमित्ताने मराठीतील एक नाव प्रसिद्धीझोतात आले आहे आणि ते नाव म्हणजे उपेंद्र लिमये. या चित्रपटातील उपेंद्र यांची ‘फ्रेडी’ ही भूमिका चांगलीच गाजत आहे. या चित्रपटाच्या निमित्ताने गप्पा मारण्यासाठी त्यांनी ‘इट्स मज्जा’च्या ‘मज्जाचा अड्डा’ या मुलाखतीच्या कार्यक्रमात हजेरी लावली होती. यावेळी मज्जाच्या टीमबरोबर गप्पा मारताना त्यांनी दाक्षिणात्य अभिनेता रघुवरण यांचा थक्क करणारा एक किस्सा सांगितला.
यावेळी उपेंद्र यांनी हा किस्सा सांगताना असे म्हटलं की, “रघुवरण असलेल्या तमिळ चित्रपटात मी एका पोलिस अधिकाऱ्याच्या भूमिकेत असतो. तर रघुवरण हे त्या चित्रपटाचे खलनायक असतात आणि मला त्यांना अटक करायची असते, असा क्लायमॅक्सचा तो सीन असतो. या सीनसाठी आम्ही खेडेगावतील एका मोठ्या शेतात शूटिंग करत होतो. भातशेती असलेल्या एका मोठ्या शेतात एक गढी असते आणि त्या गढीच्या टेरेसवर जाऊन मला रघुवरण यांना अटक करायची असते. उंच भागावर सीन शूट करायच्या असल्यामुळे तो सीन एकाच शॉटमध्ये शूट करणार असल्याचे दिग्दर्शकाने सांगितले होते. त्यामुळे तो सीन शूट करण्यासाठी सगळा सेटअप लागला होता. रघुवरण हे काही प्रसिद्ध कलाकार नव्हते. मात्र दक्षिणेत त्यांना खूप लोकप्रियता होती. त्यामुळे त्या भागात ते शूटिंगसाठी आले असल्याचे कळताच त्या पंचक्रोशीत अर्ध्या तासात किमान ७०० ते ८०० लोकं त्यांना पाहण्यासाठी जमली होती आणि गरजेनुसार तिथे फक्त मी, माझी पोलिसांची टीम व रघुवरण इतकेच त्या सीनमध्ये असणार होतो. बाकी एकही माणूस त्या सीनमध्ये नको होता. त्यामुळे आता शूटिंग कसं होणार? असा प्रश्न मला पडला. यानंतर शूटिंग सुरू व्हायच्या आधी रघुवरण त्या गढीच्या टेरेसवर आले आणि त्यांनी खालच्या त्या ७०० ते ८०० लोकांना नमस्कार केला. यावर त्या खालच्या ७०० ते ८०० लोकांनीही त्यांना नमस्कार केला. यानंतर रघुवरण यांनी त्या खालच्या लोकांना “आम्ही आता इथे शूटिंग करत आहोत त्यामुळे तुम्ही इथून जा” असं सांगितलं आणि पुन्हा त्यांनी सर्वांना नमस्कार केला. यावर त्या खालच्या लोकांनीही रघुवरण यांना नमस्कार केला आणि पुढच्या पाच मिनिटांत ते सगळे लोक तिथून निघून गेले. हे सगळं मी माझ्या डोळ्यांनी बघितलं असून या घटनेचा मी एकमेव साक्षीदार आहे.”
यापुढे “हेच आपल्याकडे असतं तर काय झालं असतं याची तुम्ही कल्पना करा?” असं म्हणत त्यांनी ‘सावरखेड एक गाव’ या चित्रपटाचा एक किस्सा सांगितला. “चित्रपटाच्या शूटिंगच्यावेळी गर्दी नियंत्रणात येत नव्हती म्हणून आम्हाला शूटिंग रद्द करावं लागलं होतं” असं म्हटलं. दरम्यान रघुवरण यांच्या त्या किस्स्यावरुन “दक्षिणेतल्या लोकांचे कलाकारांवर किती प्रेम व आदर आहे हे दिसून येते. याचं अर्थ असा नाही की मराठी प्रेक्षकांचे मराठी कलाकारांवर प्रेम नाही. पण माझ्यासाठी हा अनुभव काहीतरी वेगळाच होता” असंही त्यांनी म्हटलं.
दरम्यान, ‘अॅनिमल’ या चित्रपटातील त्यांची भूमिका लक्षवेधी ठरत असून त्यांच्या एण्ट्रीला चित्रपटगृहांत प्रेक्षक टाळ्या-शिट्ट्या वाजवताना दिसत आहेत. त्याचबरोबर त्यांच्या ‘चांगभलं’ या डायलॉगने ते चित्रपटगृहातील प्रेक्षकांची चांगलीच दाद मिळवत आहेत. त्यामुळे चित्रपटात अनिल कपूर, रणबीर कपूर, बॉबी देओलसारखे बॉलिवूडमधील मोठे स्टार्स असले तरी मराठमोळे उपेंद्र लिमये चांगलेच भाव खाऊन गेले आहेत असं म्हटलं तर अतिशयोक्ती होणार नाही.