ज्येष्ठ मराठी चित्रपट व नाट्य अभिनेते अशोक सराफ यांना कला क्षेत्रातील भरीव योगदानासाठी २०२३ वर्षाचा मानाचा महाराष्ट्र भूषण पुरस्कार देण्याची घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली. सर्वच स्तरातून अशोक सराफ यांचं कौतुक होत असल्याचं पाहायला मिळत आहे. कलाकार मंडळी, राजकीय नेते मंडळी इतकंच नव्हे तर समस्त प्रेक्षकवर्गाकडून अशोक सराफ यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव करण्यात येत आहे. जबरदस्त अभिनय, विनोदी भूमिका यांमुळे अशोक सराफ नेहमीच प्रेक्षकांच्या पसंतीस पडले. मराठीसह हिंदी सिनेसृष्टीतही अशोक सराफ यांनी आपल्या अभिनयाची छाप सोडली. (Ashok Saraf Incident)
प्रेक्षकांचं भरभरुन मिळालेलं प्रेम व नुकताच मिळालेला महाराष्ट्र भूषण पुरस्कार हा अशोक सराफ यांच्यासाठी आजवर कामाची पोचपावती आहे असं म्हणणं चुकीचं ठरणार नाही. लाखो प्रेक्षकांच्या हृदयावर राज्य करणारे हे लाडके व्यक्तिमत्त्व एका भीषण अपघातातून बचावले होते. हा अपघात एक पुर्नजन्मच होता असं म्हणत घडलेली घटना त्यांनी ‘मी बहुरूपी’ या पुस्तकात सांगितला आहे.
अशोक सराफ म्हणाले की, “पुण्यातलं शूटिंग आटोपून दुसऱ्या शूटिंगला जाण्यासाठी कोल्हापूरला निघालो होतो. दिवसभर शूटिंगमुळे खूप थकलो असल्याने गाडीतच झोप लागली होती. १७ एप्रिल १९८७ रोजी सकाळी ८ वाजण्याच्या सुमारास गाडी खेड शिवापूरजवळ आली. गाडीच्या समोरून एका एसटीच्या मागून आणखी एक एसटी जात होती. गाडीचा ड्रायव्हर एकच एसटी असल्याचे समजून ओव्हरटेक करायला गेला आणि इथेच घात झाला. आणि त्याच वेळी समोरून एक ट्रक आला. आमची गाडी आणि ट्रक एकमेकांवर आदळले. हेडऑन. माझा ड्रायव्हर त्या भीषण अपघातातून वाचला नाही. मीसुद्धा गाढ झोपेत होतो. मी गाडीबाहेर फेकला गेलो आणि म्हणूनच बहुधा मी वाचलो”.
पुढे ते म्हणाले आहेत की, “दरम्यान, एका बंगाली माणसानं मला ओळखलं. परंतु त्यांनी निदान मला हॉस्पिटलमध्ये पोचवलं हेही काही कमी म्हणता येणार नाही. अपघाताच्या जागेपासून ससून हॉस्पिटल पंचवीसेक किलोमीटर अंतरावर असावं. ससून हॉस्पिटलमध्ये बराच वेळ कोणतेही उपचार न मिळता मी स्ट्रेचरवर तसाच पडून होतो. बाहेर तुफान गर्दी जमू लागली होती. कल्पना कौशल नावाची एक मुलगी तिथे आली होती. त्यावेळी ती ससून हॉस्पिटलवर एक डॉक्युमेंटरी बनवत होती. परंतु गुड फ्रायडे असल्यामुळे तिला कोणी भेटलं नाही. हॉस्पिटलबाहेरची गर्दी पाहून कुतूहलापोटी ती आत आली. तिला समोरून येणारं स्ट्रेचर आणि त्यावर पडलेला मी दिसलो. तिनं मला बघितलं आणि ती थांबली. तिनं माझ्या सगळ्या गोष्टी टिपून घेतल्या. खिशात किती पैसे आहेत तेही. ही सगळी यादी तिनं पोलिसांनाही दिली”.
यापुढे त्यांनी असं लिहिलं आहे की, “मला तर वाटतं, जणू काही माझा जीव वाचवण्यासाठीच ती हॉस्पिटलमध्ये आलेली होती, तिनं मला बघितलं आणि म्हणाली, ‘ये अशोक सराफ है. इन्हें ट्रीटमेंट नहीं मिल रही. पण पुढे काय करावं तिला सुचेना म्हणून तिनं पुणे गेस्ट हाऊसला फोन लावला. अभिनेते सूर्यकांत यांनी फोन घेतला. त्यानंतर ही बातमी अजय सरपोतदारला कळली. बातमी कळल्यावर अजय ताबडतोब ससूनला आला. त्यानं मला संचेतीमध्ये हलवलं. आणखी काही तास तिथे तसाच पडून राहिलो असतो तर माझं काही खरं नव्हतं. अजय नसता तर कदाचित मी तेव्हा वाचलो नसतो. अपघाताची केस म्हणून ससूनमध्ये मला हात लावू देत नव्हते”.
अपघाताबाबत बोलताना अशोक सराफ म्हणाले, “माझ्या अपघाताची बातमी एव्हाना सगळीकडे पसरली होती. ज्या ट्रकवर आमची अँबेसेडर आपटली त्या ट्रकचा ड्रायव्हर व क्लीनर दोघंही बचावले नाहीत. त्या ट्रकवर एक कुटुंब बसून प्रवास करत होतं. गाडी आणि ट्रकची टक्कर झाल्यानंतर त्या सगळ्या बॅगा घरंगळत खाली आल्या आणि त्याबरोबर ते कुटुंबही. सुदैवानं त्यांना काहीही झालं नाही. अपघात झाल्यावर मी सीटसकट गाडीच्या बाहेर फेकला गेलो होतो. किती वेळ मी रस्त्यावर पडून होतो मला माहीत नाही. पण, माझ्याकडची एकही वस्तू चोरीला गेली नाही. आईनं दिलेली सोन्याची चैन गळ्यात तशीच्या तशी होती. खिशातल्या पैशांना कोणी हात लावलेला नव्हता. हातातली अंगठी कोणी काढून नेलेली नव्हती. बॅग फाटली होती पण त्यातल्या एका वस्तूलाही कोणी स्पर्श केलेला नव्हता”. त्यावेळी तब्बल दोन महिने त्यांनी हॉस्पिटलमध्ये उपचार घेतले असून सहा महिने त्यांनी आराम केला असल्याचं त्यांच्या ‘मी बहुरूपी’ या पुस्तकात त्यांनी म्हटलं आहे.