करण सिंग ग्रोवर व बिपाशा बसू यांचा शुभविवाह ३० एप्रिल २०१६ रोजी संपन्न झाला. लग्नाच्या जवळपास सहा वर्षानंतर या जोडप्याने गोंडस अशा मुलीला जन्म दिला. १२ नोव्हेंबर २०२२ रोजी त्यांना मुलगी झाली. देवीमुळे करण व बिपाशा यांना आई-वडील होण्याचे वरदान मिळाले. लेकीच्या येण्यानंतर दोघेही खुश असलेले पाहायला मिळाले.यामुळे त्यांच्या कुटुंबातही आनंदाचं वातावरण पसरलेलं पाहायला मिळालं. मात्र, आपल्या मुलीच्या जन्मानंतर तिसऱ्या दिवशी तिच्या हृदयाला दोन छिद्रे असल्याचे कळताच दोघेही कोलमडले. (Bipasha Basu And Karan Singh Grover)
या आजाराबाबत माहिती समोर येताच व मुलगी देवी हिची ओपन हार्ट सर्जरी करावी लागणार हे कळताच बिपाशा व करण यांच्या पायाखालची जमीन कोसळली. करण आपल्या मुलीच्या हृदयाच्या शस्त्रक्रियेबद्दल खूप काळजीत होता पण बिपाशाने या परिस्थितीतही खूप धैर्य दाखवले. ‘इंडिया टुडे’ने दिलेल्या वृत्तानुसार, या कठीण प्रसंगाबद्दल बोलताना करण सिंग ग्रोव्हरने सांगितले की, “चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान त्याला ही हृदय हेलावणारी बातमी मिळाली. त्यामुळे चित्रपटाच्या प्रत्येक शेड्यूलच्या सुरुवातीला मला वाटायचे की, हे प्रकरण खूप गंभीर असल्याने मला शूटिंगकडे लक्ष देता येणार नाही. त्यामुळे कुटुंबापासून दूर राहणे खूप कठीण होते. ही परिस्थिती मी चांगल्याप्रकारे सांभाळू शकलो नाही असं मला अजूनही वाटतं”.
पुढे तो असंही म्हणाला की, “जमिनीवर पाणी वाहत असल्यासारखे मी स्वतःला समजू लागलो. मला वाटतं की, बिपाशामुळेच मला त्या टप्प्यातून जाण्याची ताकद मिळाली. मला असे वाटते की, या परिस्थितून जाणे माझ्यासाठी काही सोप्पे नव्हते, बिपाशाने हे सर्व काही सांभाळत ही परिस्थिती माझ्यासाठी सोप्पी केली”.
करण सिंग ग्रोव्हरने पुढे सांगितले की, “मला तो काळ खूप चांगला आठवतो जेव्हा आम्ही हॉस्पिटलमध्ये होतो आणि आम्हाला देवीला डॉक्टरांकडे सोपवायचे होते, पण ते करायला माझं मन तयार नव्हतं. पुढे पत्नीचे कौतुक करताना तो म्हणाला, “त्याने बिपाशाला ‘सिंहिणी’ म्हटले”. ती एक अत्यंत ताकदवान व्यक्ती आहे, आणि आई बनल्यानंतर तर ती एक अद्भुत व्यक्ती बनली आहे. तसेच मी सर्व सर्जनचे आभार मानू इच्छितो” असंही करण ग्रोव्हर म्हणाला.