संदीप रेड्डी वंगा यांच्या ‘ॲनिमल’ या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर बक्कळ कमाई करत प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवलं. बऱ्याच प्रेक्षकांनी ॲनिमल चित्रपटाचं भरभरुन कौतुक केलं तर अनेकांनी त्यावर टीकाही केली. त्याचवेळी किरण राव यांनी ॲनिमलच्या विरोधात केलेलं भाष्य चित्रपटाचे दिग्दर्शक संदीप रेड्डी वंगा यांना आवडले नाही. दरम्यान त्यांनी किरण राव यांच्यावर टीका करत त्यांना आमिर खानचे चित्रपट पाहण्याचा सल्ला दिला. यावर आता किरण राव यांनी वंगा यांना प्रत्युत्तर दिले आहे. (Kiran Rao On Sandeep Reddy Vanga)
‘द क्विंट’ला दिलेल्या मुलाखतीत किरण राव म्हणाली, “मी संदीपच्या चित्रपटांवर कधीही भाष्य केले नाही कारण मी ते पाहिलेले नाहीत. मी अनेकदा स्त्री-द्वेष व पडद्यावर महिलांचे प्रतिनिधित्व याबद्दल भाष्य केलं आहे. मी अनेक मंचांवर याबद्दल अनेकदा बोलले आहे. पण मी कधीही कोणत्याही चित्रपटाचे नाव घेतले नाही कारण ते कोणत्याही विशिष्ट चित्रपटाबद्दल केलं गेलेलं भाष्य नाही. मी त्याच्या चित्रपटाबद्दल बोलत आहे असे वंगा याने का गृहीत धरले. त्याचा चित्रपट मी कधीच पाहिला नाही”.
संदीप रेड्डी वंगा यांनी सांगितले की, “आमिरने स्वतः ‘खंबे जैसी खडी है’ सारखी गाणी गायली आहेत”. यावर किरण राव म्हणाली की, “तिचा माजी पती अशा मोजक्या लोकांपैकी एक होता ज्यांनी यासाठी माफी मागितली होती”. ती म्हणाली, “असे खूप कमी लोक आहेत जे आपल्या कामाकडे मागे वळून पाहतील आणि चुकीच्या गोष्टीबद्दल माफी मागतील”.
“संदीप रेड्डी वंगा यांना आमिरशी चर्चा करण्यासाठी काही विशिष्ट मुद्दे असतील तर त्यांनी आमीरशी थेट ‘वन-ऑन वन’ संभाषण करावे”, असेही राव म्हणाले. मिस्टर परफेक्शनिस्ट आमिर खान व त्याची पूर्वश्रीमीची पत्नी किरण राव नेहमीच कोणत्या ना कोणत्या कारणामुळे चर्चेत असतात. घटस्फोट घेतल्यानंतरही दोघांमधील बॉण्डिंग काहींना भावतं, तर काहींना ते खटकतं.