‘तू जीवाला गुंतवावे’ या मालिकेच्या सेटवर अजिंक्य ननावरे व शिवानी सुर्वे यांची पहिली भेट झाली होती. हाय-हॅलो करण्यापर्यंत ही मैत्री होती पण, मालिका संपल्यावर ही मैत्री खऱ्या अर्थाने सुरु झाली. दोघांनी जेव्हा आपापल्या घरी त्यांच्या नात्याबद्दल सांगितलं तेव्हा दोन्ही घरांतून त्यांच्या नात्याला विरोध करण्यात आला. हे केवळ आकर्षण आहे, प्रेम नाही असं म्हणत त्यांनी दोघांना एकत्र राहून दाखवण्याचे चॅलेंज दिले. तब्बल चार वर्ष ही जोडी लिव्हिंग रिलेशनशिपमध्ये राहिल्यानंतर दोघांच्या घरच्यांकडून अजिंक्य व शिवानी यांच्या नात्याला हिरवा कंदील मिळाला. (Ajinkya Nanaware And Shivani Surve Wedding)
अखेर जवळचे मित्र-मैत्रिणी व कुटुंबियांच्या उपस्थितीत १ फेब्रुवारी रोजी ठाण्यातील येऊर हिल येथे शिवानी व अजिंक्य यांचा विवाहसोहळा संपन्न झाला. शिवानी-अजिंक्यच्या लग्नातील असंख्य फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. तसेच या जोडप्याच्या लग्नाला कलाविश्वातील अनेक कलाकारांनी देखील हजेरी लावली होती. या सेलिब्रिटी जोडप्याने ३१ जानेवारीला साखरपुडा उरकत चाहत्यांना सुखद धक्का दिला. अखेर ही जोडी लग्नबंधनात अडकल्यानंतर त्यांच्या लग्नसोहळ्यात खास क्षणांचे एक रील सोशल मीडियावरुन शेअर करण्यात आले आहे.
शिवानी व अजिंक्य यांच्या लग्नसोहळ्यातील खास क्षणांचे हे रील पाहता अनेकांनी त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव केला आहे. “माझ्या आयुष्यातील खूप महत्त्वाची भूमिका तिने साकारली आहे. ती जशी आहे तशी मला हवी आहे. आणि आयुष्यभर ती मला माझ्याबरोबर हवी आहे. खूप धन्यवाद. एवढी सोन्यासारखी मुलगी तुम्ही मला देत आहात” असं अजिंक्य म्हणताना दिसत आहे. यापुढे त्यांच्या शाही विवाहसोहळ्यात धमाल मस्ती पाहायला मिळत आहे.
या व्हिडीओमध्ये, शिवानी व अजिंक्य यांच्या लग्न लागतानाचे खास क्षण पाहायला मिळत आहेत. तर कुटुंबीयांसह नवऱ्या मुलाची वरात व त्यात अजिंक्यने धरलेला ठेका लक्ष वेधून घेत आहे. शिवाय कलाविश्वातील अभिनेत्री मेघा धाडे हिने मैत्रीण शिवानीची लग्नगाठ बांधलेलीही पाहायला मिळत आहे. शिवानी व अजिंक्यच्या शाही विवाहसोहळ्याची खास झलक दाखवणाऱ्या या व्हिडीओवर अनेकांनी हार्ट इमोजी शेअर करत या व्हिडीओला पसंती दर्शविलेली पाहायला मिळत आहे.