कलर्स वाहिनीवरील ‘बिग बॉस १७’ हा लोकप्रिय शो दिवसेंदिवस अधिकच रंजक व गंमतीदार होत चालला आहे. या शोमधून आतापर्यंत सना रईस खान, सनी आर्या, जिग्ना व्होरा, नावेद सोल, मनस्वी व सोनाली बन्सल हे सहा स्पर्धक घराबाहेर पडले आहेत. या शो मध्ये येणारे नवनवीन ट्विस्टस या शोची चाहत्यांमधील उत्कंठा शिगेला नेत आहेत. अशातच आता या शोमध्ये पुन्हा एकदा एक मोठा ट्विस्ट येणार आहे. मुन्नवरची एक्स-गर्लफ्रेंड या शोमध्ये वाईल्ड कार्ड स्पर्धक म्हणून येणार आहे. (Bigg Boss 17 New Promo)
या शोचा एक नवीन प्रोमो समोर आला असून यात आयेशा खानची घरात एण्ट्री होणार असल्याचे दिसत आहे. या प्रोमोमध्ये ती असं म्हणते की, “सर्वजण तिला आयेशा खान म्हणून ओळखतात आणि मुन्नवर फारुकीबरोबर तिचा जुना इतिहास आहे. मुन्नवर या घरात जसा वागतो तसा तो अजिबात नाही. मला तो माझ्यावर प्रेम करतो आणि माझ्यासारख्या मुलीबरोबर लग्न केलं पाहिजे असं तो म्हणाला होता. चुकांना माफी असते. पण गुन्ह्याला माफी नसते. त्याने जे काही केलं आहे तो एक गुन्हा आहे. मी जेव्हा या शो मध्ये जाईन तेव्हा त्याने माझी माफी मागावी अशी माझी इच्छा आहे.”
एका मुलाखतीत आयेशाने “‘बिग बॉस’मधील एका स्पर्धकाने मला संगीत व्हिडीओ बनवण्यासाठी फोन केला होता. पण तो व्हिडीओ येणार नाही हे मला माहिती होते. यानंतर तो माझ्यावर प्रेम करु लागला आणि मलाही तो आवडू लागला. यानंतर आम्ही रिलेशनमध्ये होतो. आमच्या रिलेशनआधी तो आणखी एका रिलेशनमध्ये असल्याचे मला माहीत होते. पण त्याने मला त्याचं ३-४ महिन्यांपूर्वी ब्रेकअप झाले असल्याचे सांगितले आणि मीही त्यावर विश्वास ठेवला.” या संपूर्ण मुलाखतीत तिने मुन्नवरचे नाव घेतले नाही. पण ती मुन्नवरबद्दलच बोलत असल्याचे अनेकांनी म्हटले आहे.
दरम्यान, त्यांच्यात खरंच काही नाते आहे का? तिच्या बोलण्यात कितपत तथ्य आहे? आणि ‘बिग बॉस’मध्ये आल्यावर त्यांच्यात काही संघर्ष निर्माण होणार का? यासाठी प्रेक्षक आतुर आहेत. तसेच या नवीन प्रोमोखाली मुन्नवरच्या समर्थनार्थ त्याच्या चाहत्यांनी आयेशा खानला ट्रोल केले आहे आणि ‘बिग बॉस १७’ मध्ये प्रवेश ती फक्त स्वत:कडे लक्ष वेधून घेण्यासाठीच प्रवेश करत असल्याचे म्हटले आहे.