अभिनेता श्रेयस तळपदेच्या तब्येतीबाबत अचानक आलेल्या बातमीने त्याच्या चाहत्यांसाह अनेकांनाच आश्चर्याचा धक्का बसला. श्रेयसला हृदयविकाराचा झटका आल्याची बातमी समोर आल्याने सर्वत्र काळजीच वातावरण पाहायला मिळालं. श्रेयस ‘वेलकम टू जंगल’ या चित्रपटाचं शूटिंग करत होता. चित्रीकरण संपवून तो घरी आला असताना ही घटना घडली असल्याचे म्हटले जात आहे. शूटिंगनंतर घरी येताच त्याला अस्वस्थ वाटत असल्याचं त्याने पत्नीला सांगितलं. त्यानंतर त्याला लगेच अंधेरीमधील बेलव्हू रुग्णालयात दाखल करण्यात आलं असून त्याच्यावर अँजिओप्लास्टी करण्यात आली. (Shreyas Talpade Health Update)
अभिनेत्याला हृदयविकाराचा झटका आल्याच्या दोन दिवसांनंतर आता तो बरा होत असल्याचे वृत्त समोर आले आहे. ‘बॉम्बे टाईम्स’ने दिलेल्या वृत्तानुसार, श्रेयस शनिवारी सकाळी त्याच्या कुटुंबाकडे पाहून हसला. यामुळे साऱ्यांनाच दिलासा मिळाला आहे. यावर श्रेयसच्या कुटुंबातील एका सदस्याने अशी प्रतिक्रिया दिली आहे की, “श्रेयस आता बरा आहे. त्याच्यावरील शस्त्रक्रिया ही व्यवस्थित पार पडली आहे. आज सकाळी तो आमच्याकडे बघून हसला. त्यामुळे आम्हाला बरे वाटले. त्याच्या तब्येतीत हळूहळू सुधारणा होत आहे. तसेच येत्या काही दिवसांत तो स्वत: तुमच्याशी संवाद साधेल.”
श्रेयसच्या तब्येतीबाबत त्याच्या पत्नीने सोशल मीडियावर पोस्ट करत अपडेट दिली होती. यात तिने श्रेयसच्या तब्येतीचे वृत्त कळताच अनेकांनी दाखवलेल्या काळजी, प्रेम व प्रार्थनेसाठी कुतज्ञता व्यक्त केली होती. डॉक्टरांनी वेळेवर तातडीने केलेल्या मदतीसाठी व त्यांनी दाखवलेल्या कौशल्याबद्दल तिने धन्यवाद म्हटले होते. तसेच श्रेयसच्या तब्येतीत आता सुधारणा होत असल्याचेही तिने या पोस्टद्वारे सांगितले होते.
दरम्यान, मराठीतील अनेक कलाकार मंडळींनीही त्याच्या तब्येतीवर चिंता व्यक्त केली होती. अभिनेत्री रेशम टिपणीसने “काळजी घे. श्रेयसला लवकरच बरं वाटेल. गणपती बाप्पा त्याची काळजी घेत आहे” असं म्हटलं होतं. तर अभिनेत्री सुकन्या मोने यांनीही “श्री स्वामी समर्थ” असं म्हणत त्याच्या तब्येतीसाठी देवाकडे प्रार्थना केली आहे. तसेच श्रेयसच्या अनेक चाहत्यांनीही कमेंटद्वारे त्याला “लवकर बरा हो” असं म्हटलं आहे.