‘बिग बॉस मराठी’ फेम अभिनेता प्रसाद जवादे व अभिनेत्री अमृता देशमुख हे गेले काही दिवस त्यांच्या लग्नामुळे चांगलेच चर्चेत आहेत. ‘बिग बॉस’मध्ये असताना त्यांच्यात मैत्री झाली. त्यानंतर त्यांच्या मैत्रीचं रूपांतर प्रेमात झालं. यानंतर त्यांनी सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत त्यांच्या प्रेमाची कबुली दिली होती. अशातच गेल्या महिन्यात ही जोडी एकेमकांबरोबर शाही पध्दतीने विवाहबंधनात अडकली. लग्नामुळे चर्चेत असलेला अभिनेता आता पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. प्रसाद लवकरच एका नव्या भूमिकेतून प्रेक्षकांच्या भेटीस येत आहे. (Prasad Jawade New Serial Entry)
सन मराठी वाहिनीवरील ‘सावली होईन सुखाची’ या लोकप्रिय मालिकेतून प्रसाद प्रेक्षकांच्या भेटीस येत आहे. नुकताच या मालिकेचा एक नवीन प्रोमो सोशल मीडियावर शेअर करण्यात आला आहे आणि या नव्या प्रोमोमध्ये प्रसाद झळकला आहे. मालिकेतील त्याच्या भूमिकेचं नाव ‘समर’ असं आहे आणि या मालिकेत त्याची भूमिका नकारात्मक असल्याचे दिसत आहे. त्यामुळे त्याच्या या नवीन भूमिकेसाठी चाहते चांगलेच उत्सुक आहेत.
या मालिकेआधी प्रसाद कलर्स मराठीवरील ‘काव्यांजली’ या मालिकेत झळकला होता. या मालिकेत त्याने ‘प्रितम’ ही भूमिका साकारली होती. पण लग्नामुळे प्रसादने या मालिकेमधून एक्झिट घेतली होती. त्याच्या एक्झिटनंतर अनेकांनी नाराजी व्यक्त केली होती. प्रसादच्या एक्झिटनंतर मालिकेत त्याच्याऐवजी आदिश वैद्य या अभिनेत्याची एण्ट्री झाली.
दरम्यान, आता लग्नानंतर प्रसाद-अमृता आपापल्या कामात व्यस्त झाले आहेत. अमृताच्या ‘नियम व अटी लागू’ या नाटकाचे दौरे चालू झाले आहेत तर प्रसादही नव्या भूमिकेतून प्रेक्षकांच्या भेटीस येत आहे. यामुळे प्रसाद-अमृताचे चाहते चांगलेच उत्सुक आहेत. दरम्यान, मालिकेतली प्रसादची एण्ट्री पाहून प्रेक्षकांनी आनंद व्यक्त केला आहे. या नवीन प्रोमोखाली कमेंट्सद्वारे चाहत्यांनी त्याला शुभेच्छाही दिल्या आहेत.