मराठमोळा अभिनेता श्रेयस तळपदेला गुरुवारी (१४ डिसेंबर) रात्री हृदयविकाराचा झटका आल्याची माहिती समोर आली. त्याच्या तब्येतीबाबत अचानक आलेल्या या बातमीमुळे कलाकारांसह अनेक चाहत्यांनी चिंता व्यक्त केली आहे. श्रेयस ‘वेलकम टू जंगल’ या चित्रपटाचं शूटिंग करत होता. ते संपवून तो घरी आला असताना ही घटना घडली. शूटिंगनंतर घरी येताच त्याला अस्वस्थ वाटत असल्याचं त्याने पत्नीला सांगितलं. त्यानंतर त्याला लगेच अंधेरीमधील बेलव्हू रुग्णालयात दाखल करण्यात आलं आणि त्याच्यावर अँजिओप्लास्टी करण्यात आली. (Shreyas Talpade Health Update)
अशातच ‘अॅनिमल’ फेम बॉलिवूड अभिनेता व श्रेयसचा जवळचा मित्र बॉबी देओलने श्रेयसचे हृदय १० मिनिटांसाठी बंद झालं होतं असा खुलासा केला आहे. बॉबीला श्रेयसच्या तब्येतीबाबत कळताच त्याची विचारपूस करण्यासाठी बॉबीने त्याच्या पत्नीला फोन केला होता. तेव्हा पत्नीने श्रेयसचे हृदय १० मिनिटांसाठी बंद झाले असल्याचे बॉबीला सांगितले.
आणखी वाचा – श्रेयस तळपदेला हृदयविकाराचा झटका, रुग्णालयात दाखल, आता कशी आहे प्रकृती?
यासंदर्भात ‘बॉलिवूड हंगामा’शी संवाद साधताना बॉबीने श्रेयसच्या तब्येतीबाबत संपूर्ण माहिती दिली. बॉबीने श्रेयसच्या पत्नीला फोन केला. दरम्यान श्रेयसच्या पत्नीने बॉबीला घडलेला संपूर्ण प्रकार सांगितला. यावेळी बॉबी असं म्हणाला, “मी त्याच्या पत्नीशी बोललो. ती खूप निराश झाली आहे. श्रेयसचं हृदय जवळपास १० मिनिटं काम करणं बंद झालं होतं. पण लगेचच त्याच्यावर उपचार करण्यात आले. अँजिओप्लास्टीही झाली. आता त्याच्या उत्तम आरोग्यासाठी आपण देवाकडे प्रार्थना करु”.
दरम्यान, श्रेयसची पत्नी दिप्तीने नुकतीच त्याच्या तब्येतीबाबत सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर करत माहिती दिली आहे. तिने या पोस्टमध्ये “माझ्या पतीची तब्येत बिघडल्यानंतर तुम्ही दाखवलेली काळजी, प्रेम व प्रार्थनेसाठी मी मनापासून कृतज्ञता व्यक्त करते. श्रेयसची प्रकृती आता पूर्णपणे स्थिर आहे आणि काही दिवसांतच त्याला डिस्चार्ज मिळणार आहे.” असं म्हटलं आहे.