विशाखा सुभेदार यांच्या ‘कुर्रर्रर्र’ या नाटकाची सध्या सोशल मीडियावर विशेष चर्चा रंगलेली पाहायला मिळत आहे. या नाटकातून दोन महत्त्वाच्या चेहऱ्यांनी एक्झिट घेतली असल्याचं समोर आलं आहे. अभिनेत्री नम्रता संभेराव व अभिनेता प्रसाद खांडेकर या दोघांनी नाटकातून एक्झिट घेत असल्याची पोस्ट विशाखा सुभेदार यांनी त्यांच्या इंस्टाग्राम अकाऊंटवरून शेअर केली आहे. विशाखा सुभेदार यांनी ही पोस्ट शेअर करतच दोन नवे चेहरे त्याजागी आल्याचंही सांगितलं. (Vishakha Subhedar On Kurrr)
काही दिवसांपूर्वी विशाखा यांनी त्यांच्या सोशल मीडिया अकाऊंटवरून नाटकादरम्यान काही बदल होणार असल्याचं सांगितलं होतं. मात्र हा नेमका बदल काय असणार, हे त्यावेळी स्पष्ट केलं नव्हतं, त्यामुळे अर्थात साऱ्या प्रेक्षकांच्या नजरा त्यांच्या पोस्टकडे लागून राहिल्या होत्या. त्यानंतर विशाखा यांनी एक पोस्ट शेअर करत नाटकातून दोन कलाकार एक्झिट घेणार असल्याचं सांगितलं. अभिनेत्री नम्रता संभेराव व अभिनेता प्रसाद खांडेकर नाटकांतून एक्झिट घेणार असून त्याजागी प्रियदर्शन जाधव व मयुरा रानडे हे कलाकार दिसणार असल्याचं त्यांनी सांगितलं.
‘कुर्रर्रर्र’ नाटकातून प्रसाद-नम्रता यांनी एक्झिट घेतल्यामुळे रसिक प्रेक्षकांमध्ये नाराजीचं वातावरण पसरलं आहे. विशाखा यांच्या या पोस्टवर अनेकांनी कमेंट करत प्रतिक्रिया दिल्या आहेत. दरम्यान प्रेक्षकांच्या नाराजीला विशाखा हिने प्रतिउत्तर दिलेलं पाहायला मिळत आहे. त्यांच्या या पोस्टवर एका नेटकऱ्याने कमेंट करत, “मज्जाच गेली. नमा-प्रसादची केमिस्ट्री हा नाटकातला मुख्य मसाला होता” असं म्हटलं आहे. नेटकऱ्याच्या या कमेंटवर विशाखा हिने कमेंट करत, “या बघायला आधीच नका ठरवू, तुम्हाला वेगळा मसाला नक्कीच पाहायला मिळेल. मसाले वेगळे वापरले तर चव चांगली लागू शकते. एकदा येऊन तर बघा” असं म्हटलं आहे.

तर नम्रताच्या चाहत्याने कमेंट करत म्हटलं आहे की, “नमुची जागा कोणी घेऊ शकत नाही. जशी तुमची ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’मधील जागा कोणी घेऊ शकत नाही अगदी तशी”. या नेटकऱ्याच्या कमेंटवरही विशाखा यांनी प्रतिउत्तर देत, “खरंय. पण शो जागेवर बसण्यापेक्षा हे बरं नाही का?” असा सवाल केला आहे. एकूणच नम्रता-प्रसादच्या एक्झिटने प्रेक्षकवर्गामध्ये नाराजीचा सूर उमटलेला पाहायला मिळत आहे.