मराठीसह हिंदी मनोरंजनविश्वात काम करत प्रेक्षकांचे मनोरंजन करणारा अभिनेता म्हणजे गश्मीर महाजनी. ‘देऊळबंद’, ‘कॅरी व मराठा, ‘कान्हा’, ‘धर्मवीर’ तसेच ‘सरसेनापती हंबीरराव’ यांसारख्या चित्रपटात त्याने महत्त्वाच्या भूमिका साकारल्या आहेत. हिंदीच्या ‘झलक दिखला जा’ या प्रसिद्ध डान्स कार्यक्रमातून तो प्रेक्षकांच्या घराघरात पोहोचला. गश्मीर एक उत्तम अभिनेता तर आहेच पण त्याचबरोबर तो उत्कृष्ट डान्सरही आहे. त्याची स्वतःची डान्स अकॅडमीही आहे. तो सोशल मीडियावर चांगलाच सक्रिय असतो. त्याचे डान्स व्हिडीओ व फोटो शेअर करत तो चाहत्यांच्या संपर्कात राहत असतो. (Gashmeer Mahajani Talk About Her Wife)
गश्मीर हा सोशल मीडियाद्वारे चाहत्यांच्या नेहमीच संपर्कात राहत असतो. नुकताच त्याने इन्स्टाग्राम स्टोरीवर ‘Ask Gash’ हा खास प्रश्नोत्तरांचा सेगमेंट केला. या सेगमेंट अंतर्गत त्याने चाहत्यांच्या दिलखुलास प्रश्नांची उत्तरे दिली. या प्रश्नोत्तरांच्या सेगमेंटमध्ये एका चाहत्याने त्याला त्याच्या पत्नीबाबत एक हटके प्रश्न विचारला. आणि गश्मीरनेही त्याच्या खास अंदाजात या प्रश्नाचे उत्तर दिले.
या चाहत्याने त्याला असा प्रश्न विचारला की, “तुमच्या क्षेत्रात तुम्हाला अनेकदा मुलींबरोबर डान्स करावा लागतो किंवा एखाद्या चित्रपटात तुम्हाला अभिनेत्रीबरोबर रोमँटिक सीन करावा लागतो, तर यावेळी तुझी पत्नी असुरक्षित होत नाही का? याबाबत तुमच्यात काय संवाद होतो?” याचं उत्तर देत गश्मीर असं म्हणाला की, “मी अशा सीनच्या वेळी माझ्या पत्नीला कायम विश्वासात घेतो. मी आणि माझ्याबरोबरची सह अभिनेत्री रोमँटिक सीन शूट करण्याअगोदर माझ्या पत्नीचे आशीर्वाद घेतो आणि मग आम्ही आमच्या कामाला लागतो. आणि दिग्दर्शक जेव्हा अॅक्शन म्हणतो तेव्हा तुम्हाला ते तुमचं काम समजूनच करावं लागतं.”
गश्मीरला लहानपणापासून डान्स व अभिनयाची आवड होती. त्यामुळे त्याने त्याच्या वडिलांच्या पावलावर पाऊल ठेवत अभिनय क्षेत्रात येण्याचा निर्णय घेतला. २०१०च्या ‘मुस्कुराके देख जरा’ या चित्रपटातून त्याने बॉलिवूडमध्ये अभिनय क्षेत्रात पदार्पण केलं. त्याचबरोबर त्याने हिंदी, मराठी क्षेत्रात बरेच चित्रपट केले. दरम्यान बराच काळ त्याचा कोणताच प्रोजेक्ट न आल्यामुळे चाहत्यांमध्ये त्याच्या नवीन कामाविषयी उत्सुकता आहे.