‘ये है मोहब्बतें’ तसेच ‘शुभ शगुन’ मालिकेत शेहजादा धामीबरोबर स्क्रीन शेअर केलेली मालिकाविश्वातील लोकप्रिय अभिनेत्री कृष्णा मुखर्जीने शोच्या निर्मात्यांवर काही गंभीर आरोप केले आहेत. ‘शुभ शगुन’चे चित्रीकरण पूर्ण केल्यानंतर अभिनेत्रीने मालिकाविश्वातून ब्रेक घेतला. काही तासांपूर्वी कृष्णाने तिच्या इंस्टाग्राम अकाऊंटवर ‘शुभ शगुन’च्या सेटवर तिच्याबरोबर घडलेला धक्कादायक अनुभवाबाबत अपडेट शेअर केली. शोच्या निर्मात्याकडून होणाऱ्या छळामुळे ती नैराश्य व चिंतेने ग्रस्त असल्याचे तिने उघड केले. अभिनेत्रीने या पोस्टमध्ये त्रासदायक गोष्टीही शेअर केल्या आहेत. तिने पोस्टमध्ये खुलासा केला आहे की, ती आजारी असताना तिला मेकअप रूममध्ये बंद करण्यात आले होते आणि पाच महिन्यांपासून तिला पगारही मिळाला नाही. यादरम्यान तिला निर्मात्याकडून धमक्याही आल्या, त्यामुळे ती बोलायला घाबरली. असे प्रकार पुन्हा घडू शकतात या भीतीने ती नवीन प्रोजेक्ट्सवर सही करणे टाळत आहे. (Krishna Mukherjee Share Horrific Incident)
कृष्णाने इन्स्टाग्राम पोस्टमध्ये लिहिले की, “माझ्या भावना व्यक्त करण्याचे धाडस माझ्यात कधीच नव्हते, पण आज मी ठरवले आहे की यापुढे मी काहीही लपवून ठेवणार नाही. मी एका कठीण टप्प्यातून जात आहे आणि गेलं दीड वर्ष माझ्यासाठी अजिबात सोप्पं नव्हतं. मी दु:खी आहे, अस्वस्थ आहे आणि जेव्हा मी एकटी असते तेव्हा माझे मनही घाबरतं. जेव्हा मी ‘दंगल टीव्ही’साठी ‘शुभ शगुन’ हा शो करायला सुरुवात केली तेव्हापासून हे सर्व सुरु झाले. हा माझ्या आयुष्यातील सर्वात वाईट निर्णय होता”.
कृष्णा पुढे म्हणाली, “मला हा शो अजिबात करायचा नव्हता, पण मी इतरांचे ऐकून करार केला. प्रॉडक्शन हाऊस व निर्माता कुंदन सिंग यांनी मला अनेकदा त्रास दिला आहे. एकदा तर त्यांनी मला माझ्या मेकअप रूममध्ये बंद केले कारण मी आजारी होते आणि त्यावेळी मी शूट न करण्याचा निर्णय घेतला होता. कारण ते मला माझ्या कामाची फी देत नव्हते. मी आजारी होते, तरीही ते माझ्या मेकअप रूमचं दार वाजवत होते. जेव्हा मी मेकअप रुममध्ये कपडे बदलत होते, तेव्हा ते खूप जोरात दार वाजवत होते, तेव्हा असं वाटत होतं की, जणू ते दार तोडतील.
कृष्णा मुखर्जीने पुढे लिहिले की, “त्यांनी मला पाच महिन्यांपासून पैसे दिलेले नाहीत. ही खरोखरच खूप मोठी रक्कम आहे. मी प्रॉडक्शन हाऊस आणि दंगलच्या ऑफिसमध्ये गेले पण तिथेही मला काहीच उत्तर मिळालं नाही. तसेच अनेकवेळा त्यांनी मला धमकी दिली. मला भीती वाटली. मला असुरक्षित वाटत आहे. मी खूप लोकांकडून मदत मागितली पण त्याचं काहीच झालं नाही. त्यावर कोणीही काही करु शकत नव्हते. लोक मला विचारतात की, मी कोणताही शो का करत नाही? हे कारण आहे. मला भीती वाटते की पुन्हा तेच घडले तर? मला न्याय हवा आहे”.
अभिनेत्रीने ही पोस्ट शेअर करत कॅप्शनमध्ये लिहिले की, “हे लिहिताना माझे हात अजूनही थरथरत आहेत पण मला लिहावे लागले. कारण यामुळे मी चिंता व नैराश्याशी झुंज देत आहे. आम्ही आमच्या भावना लपवतो आणि सोशल मीडियावर चांगली बाजू दाखवतो. पण हे वास्तव आहे. माझे कुटुंब मला पोस्ट करु नकोस असं सांगत होतं कारण ते सर्व अजूनही घाबरलेले आहेत. ही लोक माझं नुकसान करतील अशी भीती त्यांना आहे. पण मी का घाबरू?, हा माझा हक्क आहे आणि मला न्याय हवा आहे”.