बॉलीवूडमधील सर्वात दमदार अभिनेत्रींच्या यादीत विद्या बालन हिचं नाव आवर्जून घेतलं जातं. विद्या बालनच्या ‘द डर्टी पिक्चर’ चित्रपटाची बरेचदा चर्चा रंगलेली पाहायला मिळाली. या चित्रपटात विद्याने साऊथची प्रसिद्ध अभिनेत्री सिल्क स्मिताची भूमिका साकारली होती. २०११ मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘द डर्टी पिक्चर’ने जगभरातील बॉक्स ऑफिसवर १०० कोटींहून अधिक कमाई केली होती. आणि हे यश त्या काळात महिला प्रभुत्त्व असलेल्या चित्रपटासाठी मोठी गोष्ट होती. या चित्रपटातील विद्याच्या अभिनयाचे सर्वत्र कौतुक झाले, इतकंच नव्हेतर त्या वर्षी तिच्या या भूमिकेसाठी तिला राष्ट्रीय पुरस्कारही मिळाला होता. (Vidya Balan Reveals Addicted to Smoking)
एका मुलाखतीत विद्याने सांगितले की, या चित्रपटाने तिच्या कारकिर्दीचा संपूर्ण आलेख बदलून टाकला आणि ‘असे चित्रपट निवडा ज्यात एक अभिनेता म्हणून पूर्ण मेहनत घेता येते’ ही शिकवण मिळाली. पण या चित्रपटामुळे तिला धूम्रपानाचे व्यसन लागल्याचा खुलासा विद्याने केला. Unfiltered with Samdish या युट्युब चॅनलला दिलेल्या मुलाखतीत विद्याने सांगितले की, ‘तिला सिगारेटचा वास खूप आवडतो’. अभिनेत्री म्हणाली, “‘द डर्टी पिक्चर’नंतर मी व्यसनी झाले. सिल्क स्मिताने ज्या प्रकारे स्मोकिंग केले, त्यात तिला कोणताही संकोच वाटला नाही. त्यामुळे तिला सिगारेटची सवय लागली आणि तिला व्यसनही झाले”.
विद्या म्हणाली, “चित्रपटाच्या शूटिंगपूर्वीही मी स्मोकिंग केले होते. मला सिगारेट कशी ओढायची हे माहित होते पण मी प्रत्यक्षात धूम्रपान करत नव्हते. मला काय म्हणायचे आहे ते तुम्हाला माहीत आहे. पण एक पात्र म्हणून तुम्ही ते खोटे करु शकत नाही. धुम्रपान करणाऱ्या महिलांबद्दल एक विशेष समज असल्यामुळे मी कोणताही संकोच दाखवू शकले नाही. आता याचं प्रमाण फार कमी आहे”. जेव्हा विद्याला विचारण्यात आले की, तू अजूनही धूम्रपान करते का?, तर यावर उत्तर देत विद्या म्हणाली, “नाही. मला असे वाटत नाही की मी हे कॅमेऱ्यावर सांगावे, परंतु मला धूम्रपान करणे खूप आवडते. याने माझं नुकसान होणार नाही असे कोणी म्हणत असेल तर मी हे करायला लागेन. मला धुराचा वास खूप आवडतो. माझ्या कॉलेजच्या दिवसात मी सिगारेट ओढणाऱ्या लोकांजवळ उभी राहायचे”.
विद्याने सांगितले की, “‘द डर्टी पिक्चर’ करण्याआधी तिला संकोच वाटत होता पण या चित्रपटाने तिला या संकोचापासून मुक्ती दिली. मला त्या लहान आणि क्लीवेज दाखवणाऱ्या कपड्यांबद्दल भीती वाटत होती. जेव्हा मी अभिनेत्री बनण्याचा विचार केला, तेव्हा मी हे सर्व करण्याची कल्पनाही केली नव्हती. या चित्रपटाने मला मुक्त केले. चित्रपटानंतर मला ‘सेक्सी’ म्हटले गेले, म्हणून मला वाटले की जर लोकांना वाटत असेल की मी अशी सेक्सी आहे तर त्याचा माझ्या आकाराशी काहीही संबंध नाही. या विचाराने मला मुक्त केले, अन्यथा मला नेहमीच शरीराच्या प्रतिमेच्या समस्या होत्या”.