‘चला हवा येऊ द्या’ या लोकप्रिय कार्यक्रमानंतर अभिनेता कुशल बद्रिके एका नव्या हिंदी शोमधून प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. या शोमध्ये कुशलनंतर काही दिवसांपूर्वीच आणखी एका मराठी अभिनेत्रीचीही एन्ट्री झाली. ही अभिनेत्री अभिनेत्री हेमांगी कवी-धुमाळ. हेमांगीने याआधी मराठी विनोदी कार्यक्रमातून् प्रेक्षकांचे मनोरंजन केले आहे. अशातच अभिनेत्री हेमांगी कवी आणि अभिनेता कुशल बद्रिके ही मराठमोळी जोडी हिंदी मनोरंजन विश्वात धिंगाणा करताना पाहायला मिळत आहे.
‘मॅडनेस मचायेंगे’ या हिंदी शोमधून हेमांगी व कुशल यांनी प्रेक्षकांचे भरभरून मनोरंजन केले. अशातच या शोमध्ये महाराष्ट्राची हास्यजंत्र फेम गौरव मोरेची झलकही पाहायला मिळाली. तसेच अभिनेत्री अतिषा नाईक यांनीदेखील एका भागात सहभाग घेतला होता. हिंदी विनोदी कार्यक्रमात मराठी कलाकारांच्या सहभागाने प्रेक्षकांकडून एकीकडे कौतुक केले जात आहे. तर दुसरीकडे या कार्यक्रमावर व कलाकारांवर प्रेक्षक टीका करतानाही पाहायला मिळत आहे.
आणखी वाचा – सात वर्षांनी अप्पी-अर्जुनची भेट, मात्र लेकाला भेटण्यासाठी घातली अट, बाप-लेकामधील दुरावा कधी संपणार?
नुकताच ‘मॅडनेस मचायेंगे’च्या एका भागात ‘बाहुबली’ या लोकप्रिय चित्रपटावरील प्रहसन सादर करण्यात आले. यामध्ये कुशलने ‘बाहुबलीचे तर हेमांगीने ‘शिवगामी देवी’ हे पात्र साकारले असल्याचे पाहायला मिळाले. या कार्यक्रमाचा एक प्रोमो सोशल मीडियावर व्हायरल होत असून या प्रोमोवर प्रेक्षकांनी कमेंट्सद्वारे त्यांची टीका व नाराजी व्यक्त केली असल्याचे पाहायला मिळत आहे.
या प्रोमोवर एका नेटकऱ्याने कमेंट करत “हिंदीमध्ये जाऊन पांचटगिरी चालू आहे” असं म्हटलं आहे. तर दुसऱ्याने “आपली विनोदाची पातळी एवढी खाली गेली आहे का?” असा प्रश्न विचारला आहे. एकाने “मराठी शोमधून स्क्रिप्ट्स कॉपी केल्या आहेत” असं म्हटलं आहे. तर आणखी एकाने “हे इतकेही मजेदार किंवा हास्यास्पद नाही” असं म्हटलं आहे. त्याचबरोबर एका नेटकऱ्याने “या शोद्वारे आता कचरा बाहेर पडत आहे. प्रादेशिक कलाकारांना अशा शोमध्ये प्रेमाखातर नाही तर मजबूरी म्हणून घेतात आणि हे कलाकारही त्याच थराला जातात” असं म्हटलं आहे.