‘ठरलं तर मग’ मालिकेत एकामागोमाग एक रंजक वळण येताना पाहायला मिळत आहेत. एकीकडे मालिकेत अर्जुन व सायलीची रोमँटिक डेट पाहायला मिळत आहे. तर दुसरीकडे सायली व अर्जुनच्या कॉन्ट्रॅक्ट मॅरेज समोर येणार का याची भीती वाटत आहे. मालिकेत आजच्या भागात असं पाहायला मिळत आहे की, साक्षी महीपतला जेलमध्ये येऊन भेटते. तेव्हा ती रियुनियनमध्ये गेली असल्याचं आणि अर्जुनला चैतन्यला काहीतरी सांगायचं आहे याबाबत महिपतला सांगते. रियुनियनमध्ये एका मुलाने तिला ओळखलं असल्याचंही ती सांगते. यावर महीपत साक्षीला चैतन्यचा विश्वास मिळवण्यासाठी तिच्याशी साखरपुडा करण्यास सांगतो. (Tharal Tar Mag Promo)
साक्षी देखील चैतन्यबरोबर साखरपुडा करण्यास तयार होते. त्यानंतर ती मुद्दाम चैतन्यससमोर नाटक करते. ‘चैतन्य मला सोडून जाऊ नको, मी तुझ्यासोबत नाही राहू शकत.’ चैतन्य तिला शांत करतो. त्यानंतर चैतन्य तिला म्हणतो की, ‘तो तिला कधीच सोडून जाणार नाही, आपलं नातं हे असंच राहणार’. तेव्हा साक्षी संधी साधून लोकांना दिसेल असं कोणतं नातं आहे आपल्यात? असं बोलत साखरपुड्याचा विषय काढते. चैतन्य एवढी घाई कशाला असं म्हणत असतो तेव्हा मुद्दाम साक्षी अस्वस्थ होण्याचं नाटक करते. त्यावर चैतन्य साक्षीच्या काळजीपोटी साखरपुड्याला होकार देतो.
पुढील एपिसोडच्या प्रोमोमध्ये असे दाखवण्यात आले आहे की, साक्षी चैतन्यला म्हणते की, ‘अर्जुन-सायली आयडियल कपल आहेत’. यावर चैतन्य बोलतो, ‘आयडियल कपल? अर्जुन-सायली खरे कपलही नाहीत. त्यांनी एकमेकांच्या सोयीसाठी हे कॉन्ट्रॅक्ट मॅरेज केलं आहे’. हे ऐकल्यावर साक्षीच्या पायाखालची जमीन सरकते. आता साक्षी चैतन्यकडून सायली-अर्जुनच कॉन्ट्रॅक्ट मॅरेजचं सत्य कसं काढून घेणार हे पाहणं मालिकेत रंजक ठरेल. तसेच मालिकेत साक्षी अर्जुन-सायलीच्या कॉन्ट्रॅक्ट मॅरेजचं सत्य सर्वासमोर आणेल का?, याची भीती आता प्रेक्षकांमध्ये वाढून राहिली आहे.
तर दुसरीकडे अर्जुन सायलीला म्हणतो की, “काही गुन्हेगार असे असतात की ते त्यांच्या गुन्ह्याचे पुरावे कधीच नष्ट करत नाहीत. कारण त्यामुळे त्यांच्या अहंकाराला आणखी चालना मिळते. साक्षीच्या बाबतीतही हे खरं असेल तर ते पुरावे शोधायचे कुठे?”, असं म्हणत दोघेही विचार करु लागतात.