ज्येष्ठ अभिनेत्री निवेदिता सराफ यांनी आजवर सिनेसृष्टीत बरंच काम केलं आहे. सिनेसृष्टीतले बरेच वेगवेगळे अनुभव ही त्यांनी घेतले आहेत. नेहमीच त्या कोणत्या ना कोणत्या विषयावर परखडपणे मत मांडताना दिसतात. काही दिवसांपूवी निवेदिता सराफ यांनी एका मुलाखतीत नाट्यगृहांबद्दल बरंच भाष्य केलं होत. यावेळी त्यांनी एका मुद्द्याला अनुसरून नाट्यगृहांचं खासगीकरण व्हावं यावर भाष्य केलं होत. यावर ‘मित्र म्हणे’ पॉडकास्टच्या सौमित्र पोटे यांनी फेसबुक पोस्ट करत प्रत्येकाने आपापलं मत मांडत मुद्दा पटला की नाही हे सांगावं अशी पोस्ट केली होती. यावर अनेकांनी कमेंट करत आपलं मत मांडलं. दरम्यान या पोस्टवरील एका अभिनेत्रीच्या कमेंटने साऱ्यांचं लक्ष वेधून घेतलं. (Vishakha Subhedar On Nivedita Saraf)
अभिनेत्री विशाखा सुभेदार यांनी या पोस्टवर कमेंट करत सहकारण मुद्दा पटला की नाही यावर भाष्य केलं. विशाखा नेहमीच परखड व स्पष्ट मतांमुळे चर्चेत असतात, अनेकदा त्या ट्रोलर्सलाही आपलं मत सांगत उत्तर देत असतात. अशातच तिने नाट्यगृहांचं खासगीकरण व्हावं या मुद्द्यावर प्रतिक्रिया दिली आहे. विशाखाने कमेंट करत म्हटलं आहे की, “मी मुलाखत ऐकली पहिली. काही मुद्दे इतके पटले, आवडले की मी अर्धवट बघूनच ताईला फोनदेखील केला. पण हा मुद्दा (नाट्यगृहे खासगी ट्रस्टना देण्याचा) मी नंतर ऐकला. जो मला वाटलं तिच्याशी बोलावं पण ते राहून गेलं. पण खरंच सांगते हे कुठेतरी पटत नाहीये.”
“नाट्यगृहे खासगी झाली तर, ट्रस्टकडे जातील एखाद्या किंवा एखादी कंपनी कंत्राटी वर चालवायला घेतील मग भाडे वाढ, आधीच पेपर जाहिरात आणि ट्रान्सपोर्ट यामुळे नाटक हा खेळ खर्चाचे ताळमेळ ना होणारा आहे. अजून जर तिकीट वाढ केली तर प्रेक्षक येतील? पूर्वीचा आठवडा भर चालणार हा खेळ आता शनिवार, रविवारचा होऊन बसलाय. खासगीकरण फक्त स्वच्छता आणि व्यवस्था नीट व्हावी याकरिता हवं असेल तरी मी म्हणते फक्त सफाई आणि दुरुस्तीचं दर महिन्याला कंत्राट द्या. आपोआप अनेक गोष्टी मार्गी लागतील.”
‘मित्र म्हणे’ या पॉडकास्टला मुलाखत देताना नाट्यगृहाच्या खासगीकरणाबाबत निवेदिता असं म्हणाल्या होत्या की, “नाट्यगृहांच्या परिस्थितीमध्ये कोणतीही सुधारणा झालेली नाही. नाट्यगृहांमध्ये महिलांच्या खोलीत बाथरुम नाहीये. मासिक पाळीदरम्यान महिलांनी काय करायचं? त्यांचा विचारच केला जात नाही. बऱ्याचदा शासकीय कार्यक्रमांना नाट्यगृह दिली जातात. ते शासकीय कार्यक्रम लांबतच जातात.”
“पुण्यातील बालगंधर्वसारख्या नाटयगृहातील नाटकांना लांबून माणसं आलेली असतात. त्यात वयोवृद्धही असतात. आधी कार्यक्रम संपेपर्यंत दरवाजा उघडत नाही. बाहेर बसायला जागा नाही. कुठे बसणार ती माणसं? बाथरुमला कुठे जाणार? अनेकदा आम्हीही बाहेर ताटकळत उभे असतो. आम्हाला मेकअप रुम मिळत नाहीत. एखाद्या वेळेत सुरु झालेला कार्यक्रम ठरलेल्या वेळेतच संपवण्याची सवय आपल्याला अजूनही लागलेली नाही. त्यामुळे सगळी नाट्यगृहे खासगी ट्रस्टला देण्याची खूप गरज आहे.”