स्वरगंधर्व अशी करून दिले जाणारे असे दिग्गज ज्यांनी गदिमांच्या गीत रामायणाला स्वर साज चढवला आणि मराठी घराघरात, मनामनात गीत रामायण आपल्या जादुई आवाजाने अजरामर केलं असे मराठी संगीत क्षेत्रातील दिग्गज संगीतकार सुधीर फडके अर्थात आपल्या सगळ्यांचे लाडके बाबूजी यांच्या जीवनावर मराठी चित्रपट विश्वातील सर्वात भव्य, संगीतमय बायोपिक लवकरच सिनेरसिकांच्या भेटीस येणार असल्याची गोड बातमी एका मराठमोळ्या, निरागस अभिनेत्रीने दिली. अभिनेत्री मृण्मयी देशपांडे हिने इंस्टाग्राम पोस्ट शेअर करत याबातची माहिती चाहत्यांसह शेअर केली. (Mrunmayee Deshpande New Movie)
मृण्मयी देशपांडे हिने आजवर मराठी कलाविश्वात स्वतःच नाव कमावलं आहे. अभिनयाच्या, दिग्दर्शनाच्या जोरावर तिने स्वतःचा असा चाहतावर्ग निर्माण केला आहे. इतकंच नव्हे तर एक उत्तम निवेदिका म्हणून मृण्मयीचं नाव अग्रस्थानी असतं. अशातच मृण्मयी एका भव्य दिव्य संगीतमय चित्रपटाचा भाग असल्याची खुशखबर तिने पोस्ट शेअर करत दिली आहे.
मृण्मयीने ‘स्वरगंधर्व सुधीर फडके’ या सुधीर फडके यांच्या बायोपिकच मोशन पोस्टर तिच्या इंस्टाग्राम अकाऊंटवरून शेअर केलं आहे. “मनाला मोहवून टाकणारं संगीत, भाव-भक्तीचा ओलावा निर्माण करणारं शब्दसामर्थ्य आणि तीन पिढ्यांवर सांस्कृतीक जडणघडणीतून होणारा संस्कार म्हणजेच “स्वरगंधर्व सुधीर फडके” हे अजरामर नाव! मराठी चित्रपट विश्वातील सर्वात भव्य, संगीतमय बायोपिक- लवकरच!” असं कॅप्शन तिने या पोस्टला दिलं आहे. या भव्य चित्रपटाचा भाग मृण्मयी असून तिला या चित्रपटात पाहणं उत्सुकतेचं ठरणार आहे.
प्रसिद्ध दिग्दर्शक योगेश देशपांडे हे बाबूजींच्या आयुष्यावर आधारित चित्रपटाचे दिग्दर्शन करणार आहेत. तर प्रसिद्ध अभिनेता सुनील बर्वे हे सुधीर फडके यांची भूमिका साकारणार आहेत. याशिवाय आदिश वैद्य, सागर तळाशिलकर, मिलिंद पाठक, अपूर्व मोडक, शरद पोंक्षे, सुखदा खांडकेकर आदी कलाकारांच्या महत्वपूर्ण भूमिका चित्रपटात पाहायला मिळणार आहेत. मराठीतला आजवरचा सर्वात मोठा म्युजिकल बायोपिक “स्वरगंधर्व सुधीर फडके” असणार आहे. हा चित्रपट आता रुपरी पडद्यावर केव्हा येणार याकडे साऱ्यांच्या नजरा वळल्या आहेत.