‘ठरलं तर मग’ ही मालिका प्रेक्षकांची लोकप्रिय मालिका आहे. काही दिवसांपूर्वीच आलेल्या या मालिकेने अल्पावधीतच प्रेक्षकांची मनं जिंकली आहेत. टीआरपीच्या शर्यतीतदेखील ही मालिका अव्वल आहे. या मालिकेतील मुख्य कलाकारांव्यतिरिक्त सहाय्यक भूमिका व खलनायकाच्या भूमिका साकारणारे कलाकारही प्रेक्षकांच्या आवडीचे झाले आहेत. अभिनेत्री प्रियांका तेंडोलकर ही मालिकेत खलनायिकेच्या भूमिकेत असली तरी तिची भूमिकाही प्रेक्षकांना आवडत आहे. (Actress Priyannkka Tendolkar Shared Video On Instagram)
या मालिकेच्या निमित्ताने खलनायिका म्हणून काम करण्याचे तिचे एक स्वप्न पूर्ण झाल्यानंतर तिच्या नव्या घराचे स्वप्नदेखील पूर्ण झाले आहे असं म्हणायला हरकत नाही. प्रियांकाने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटद्वारे एक व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओमधून तिने नवीन घराची एक खास झलक चाहत्यांना दाखवली आहे. या व्हिडिओखाली कॅप्शनमध्ये तिच्या अनेक वर्षांची स्वप्नपूर्ती झाली असल्याचे तिने म्हटले आहे.
प्रियांकाने हा व्हिडीओ शेअर करत असं म्हटल आहे की, “खूप वर्षांपासून जे स्वप्नं बघितलं ते २ वर्षांपूर्वी पूर्ण झालं. पण ते खऱ्या अर्थानं पूर्ण झालं आहे हे मात्र मला २ दिवसांपूर्वी लक्षात आलं. आपण स्वप्नं पाहतो ते पूर्ण करायला पळतो, कष्ट घेतो. मग ती स्वप्न लवकर पूर्ण होत नाहीत म्हणून देवाला, नशिबाला दोष देतो. मग कुठे ते पूर्ण होतं. पण या गोष्टीसाठी इतकी वाट पाहिली की ते कधी पूर्ण झाल कळलंच नाही. २ दिवसांपूर्वी ही जाणीव झाली की, ही सुंदर वास्तू, इथली झाडं, फुलं सगळी आपली आहेत. हा व्हरांडा जो काही वर्षांपूर्वी फक्त स्वप्नात असायचा आज तिथल्या झोपाळ्यावर बसून मी माझी आवडती कॉफी पीत आहे.” यापुढे तिने “मला तुमच्या स्वप्नात सामील केल्याबद्दल व आमचं स्वप्नं पूर्ण केल्याबद्दल आई-बाबा व देवालाही धन्यवाद म्हटलं आहे.
दरम्यान, प्रियांकाच्या या व्हिडिओखाली चाहत्यांनी “वाह, अभिनंदन, शुभेच्छा, तुझी सगळी स्वप्ने पूर्ण होऊदेत” अशा अनेक कमेंट्स करत तिला शुभेच्छा दिल्या आहेत व तिचं अभिनंदनही केलं आहे. त्याचबरोबर मालिकेतील सहकलाकार मोनिका दबडेनेही या व्हिडीओखाली “कित्ती गोड, कधी जाऊयात?” अशी मजेशीर कमेंटदेखील केली आहे.