‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ या कार्यक्रमातून घराघरांत पोहोचलेली आणि प्रेक्षकांची लाडकी लॉली म्हणजे अभिनेत्री नम्रता संभेराव. नाटक, मालिका व चित्रपटांमध्ये विशिष्ट धाटणीच्या भूमिका साकारत तिने अभिनयाच्या जोरावर प्रेक्षकांची मनं जिंकली. ‘हास्यजत्रे’च्या मंचावर तिने अनेक पात्र साकारली असून तिच्या प्रत्येक पात्रांनी प्रेक्षकांना खळखळून हसवलं आहे.नम्रताचा आज खूप मोठा चाहतावर्ग आहे. अभिनयाबरोबरच ती सोशल मीडियावरही प्रचंड सक्रिय असते. (Namrata Sambherao Husband Birthday)
नम्रता तिच्या अभिनयक्षेत्राबरोबर वैयक्तिक आयुष्यातील बऱ्याच गोष्टी चाहत्यांसह शेअर करत असते. ती व तिचा नवरा योगेश संभेराव ही जोडी सोशल मीडियावर बऱ्यापैकी सक्रिय असते. नम्रता योगेशबरोबरचे अनेक फोटो, व्हिडीओ तिच्या सोशल मीडियावर शेअर करत असते. अशातच आज योगेशच्या वाढदिवसानिमित्त नम्रताने शेअर केलेली पोस्ट साऱ्यांच लक्ष वेधून घेत आहे.
नम्रताने पतीबरोबरचा फोटो शेअर करत त्याला शुभेच्छा देत लिहिलं आहे की, “वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा योगेश. मग कुठूनसा येईल राजकुमार, सफेद घोड्यावर होऊन स्वार, “ती फुलराणी ” मधलं हे स्वगत अनेकदा अनेक जणींनी सादर केलं आहे. मी ही केलं आणि खरोखरचं माझ्या आयुष्यात एक राजकुमार आला. माझ्या सुखात तो त्याचं सुख पाहणारा. सोबती या शब्दाला पुरेपूर न्याय देणारा, त्याने मला दिलेलं प्रोत्साहन, कौतुक, प्रेम, आधार मला कायम ताजतवानं ठेवतं, लव्ह यु योगेश. कायम हसत रहा, खुश रहा. तुझ्या सगळ्या ईच्छा स्वप्न पूर्ण होवोत हीच ईश्वरचरणी प्रार्थना”.
नम्रता व योगेशची जोडी आता लवकरच ‘एकदा येऊन तर बघा’ या चित्रपटातदेखील एकत्र पाहायला मिळणार आहे. नम्रताचा नवरा योगेश संभेराव तिच्यासह आगामी सिनेमात झळकणार आहे. नुकताच ‘एकदा येऊन तर बघा’ चित्रपटाचा ट्रेलर लाँच सोहळा सुरु असून या सोहळ्यात माध्यमांसमोर नम्रताने तिचा पती योगेशला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. ट्रेलर लॉंच सोहळ्याला नवऱ्याला हटके अंदाजात दिलेल्या या शुभेच्छा लक्ष वेधून घेत आहेत.