देशभरात लोकसभा निवडणुकांनिमित्त वातावरण चांगलंच तापल्याचं पाहायला मिळत आहे. यात सत्ताधारी विरोधकांवर तर विरोधक सत्ताधाऱ्यांवर आरोपांच्या अनेक फैरी झाडत आहेत. राजकीय पक्षांचे समर्थक व कार्यकर्ते आपापल्या राजकीय पक्षाची भूमिका मांडत विरोधकांविरुद्ध आवाज उठवत असल्याचे पहायला मिळत आहे. अशा सक्रिय असणाऱ्यांमध्ये अभिनेते किरण माने हे फारच सक्रिय असतात.
सध्याच्या या निवडणुकीच्या रणधूमाळीत किरण माने सोशल मीडियाद्वारे सत्ताधारी पक्षाबाबत व्हिडीओ, फोटो किंवा मीमद्वारे आपली भूमिका व्यक्त करत असतात. अशातच त्यांनी शेअर केलेल्या एका व्हिडीओने सर्वांचे लक्ष वेधून घेतलं आहे. किरण मानेंनी इन्स्टाग्रामवर एका महिलेचा व्हिडीओ शेअर केला आहे, ज्यामध्ये ती महिला पंतप्रधान नरेंद्र मोदींबद्दल व त्यांच्या नवीन धोरणांबद्दल टीका व्यक्त करतानाचे पाहायला मिळत आहे.
या व्हिडीओमध्ये महिलेने शिंदे गटावर टीका करत असं म्हटलं आहे की, “बाळासाहेबांचं हिंदुत्व ते नव्हतं. बाळासाहेबांचं हिंदुत्व सोडलं ते सगळे हिजडे-बिजडे असं जे म्हणत आहेत, तेच हिजडे आहेत. कारण तुम्हालाचं हिंदुत्व कळत नाही. फक्त हिंदू-मुसलमान करुन हिंदुत्व होत नाही. तुम्ही राम मंदीर बांधलं पण तुमचं वागणं रामासारखं आहे का? मोदींचं वागणं रामासारखं आहे का?”
यापुढे महिलेने मणीपुरमधील हिंसाचाराबद्दल व पंतप्रधानांबद्दल असं म्हटलं की, “तिकडे मणीपुरमध्ये महिलांना नग्न करुन त्यांची इज्जत लुटली जात आहे. तुम्ही राम आहात का? मग आता कुठल्या बाजूने तुम्ही मतं मागत आहात? तुम्ही दहा वर्षात काय केलं? हे लोकांना सांगितले पाहिजे. तुम्ही नक्की काय विकास केला? हे लोकांना सांगितले पाहिजे. हा मटन खातो, हा मंगळसूत्र घेणार हे पंतप्रधानांचे विषय आहेत का? ३७० कलम रद्द केले. त्याचा फायदा कुणाला झाला? त्याचा फायदा अदानीला झाला”.
यापुढे महिलेने राग व्यक्त करताना असं म्हटलं की, “पुढच्या दहा वर्षात भारत कुठे असणार हे पंतप्रधानांचे व्हीजन असलं पाहिजे. मी काय खाणार? मी किती मुलांना जन्म देणार हा माझा वैयक्तिक प्रश्न आहे. मोदींना हिंदुत्वाचा कुणीही ठेका दिलेला नाही. आम्ही हिंदू आहोत, आम्ही रामाला मानतो. आम्ही हिंदू आहोत की देशद्रोही आहोत हे तुम्ही आम्हाला सांगू नका ”