लहान पडद्यावरील लोकप्रिय मालिका ‘तारक मेहता का उलटा चष्मा’ या मालिकेतील कलाकार हे आजकाल जास्तच चर्चेत आहेत. या मालिकेतील रोशन सोढीचे पात्र साकरणारी जेनिफर मिस्त्री बंसीवालने या मालिकेचे निर्माते असित कुमार मोदी यांच्यावर लैंगिक शोषणाचा आरोप केला होता. या आरोपावर कार्यवाही सुरु झाली. निकाल जेनिफरच्या बाजूने लागला असून असित मोदीकडून पाच लाख रुपयांची भरपाई देखील मिळाली. पण या मिळालेल्या भरपाईने तीचे समाधान झाले नसल्याचे सांगितले आहे. (Jennifer mistry on asit kumar modi)
जेनिफरच्या बाजूने निकाल लागल्यानंतर असित मोदी यांना पांच लाख रुपये भरपाई म्हणून देण्याचे आदेश दिले आहेत. पण या निकालामुळे खुश नसल्याचे तिने स्पष्ट केले आहे. त्यामुळे आता ती उच्च न्यायालयात धाव घेणार असल्याचे सांगितले जात आहे. सध्या पवई पोलिस स्थानकात FIR बदलण्याची तयारी करत आहे. असे झाले तर असित यांच्या अडचणीत वाढ होऊन त्यांना अटक केले जाऊ शकते.
याबाबत जेनिफरने एका मुलाखतीमध्ये सांगितले आहे की, “पवई पोलिस स्थानकात मी जी तक्रार दाखल केली होती त्यावर कोणतीही कार्यवाही केली गेली नाही. आता मी पुन्हा एकदा पोलिस स्थानकात जाणार आहे”. पुढे ती म्हणाली, “गेल्या आठवड्यात मी पुन्हा एकदा एकटी तीन वेळा पोलिस स्थानकात गेले होते. पण यावेळी मी वकील घेऊन जाणार आहे. तसेच पोलिसांना आरोपपत्र दाखल करण्यासही सांगणार आहे”.
जेनिफर म्हणाली की, “पण दु:ख हे आहे की माझ्या केसवर काम करणाऱ्या अधिकाऱ्यांना पुन्हा एकदा नियुक्त करण्यात आले आहे. पण मी आता शांत बसणार नाही. मला या प्रकरणात पोलिस कार्यवाहीची अपेक्षा आहे. मी अपराधी असल्यासारखा व्यवहार माझ्याशी केला जात आहे. मला पोलिस स्थानकात ५ तास बसवून ठेवण्यात येतं. माझ्या १० वर्षाच्या मुलीला घरी सोडून मी पोलिसस्थानकात तासन् तास बसायचे. तसेच मी सर्व १०० ऑडिओ रिकोर्डिंग ट्रान्सस्क्रिप्ट केल्या असून पोलिस अधिकाऱ्यांना तपासासाठी दिल्या आहेत”.
तसेच या प्रकरणात पुढे ती म्हणाली की, “मला पैसे मिळावे म्हणून मी हे केले नाही. शिक्षेशिवाय दंड भरावा लागला तरीही ते चुकीचे काम करण्यास प्रोत्साहन देते. पाच लाख रुपये ही मोठी रक्कम नाही आहे. त्यामुळे आरोपीना शिक्षा व्हावी यासाठी मी उच्च न्यायालायत जाईन. त्यासाठी मी तयार आहे”.
दरम्यान या प्रकरणाला पुढे कोणते वळण लागेल हे सध्यातरी सांगता येत नाही. त्यामुळे आता असित मोदी यांना अटक होणार की अजून कोणती कारवाई होणार याबद्दल गोंधळ सुरु आहे.