‘तारक मेहता का उल्टा चष्मा’ मधील सोधी म्हणजेच गुरुचरण सिंग बेपत्ता झाल्याच्या बातमीने सर्वांनाच धक्का बसला आहे. अभिनेत्याच्या कुटुंबाबरोबरच त्याचा मित्रपरिवारही त्याच्या काळजीत असल्याचं समोर आलं आहे. गुरुचरण सिंग २२ एप्रिलपासून बेपत्ता असून त्यांचा अद्याप शोध लागलेला नाही. अभिनेत्याच्या वडिलांनी दिल्लीतील पालम पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती, त्यानंतर पोलीस तपास सुरु असल्याचं समोर आलं. आता निर्माता व अभिनेते जेडी मजिठिया यांनी गुरुचरण सिंग यांच्या बेपत्ता होण्याबाबत एक महत्त्वाची गोष्ट सांगितली आहे. त्यांनी सांगितले की, त्यांची व गुरुचरण सिंगची मैत्रिण भक्ती सोनी २२ एप्रिलला अभिनेत्याला घेण्यासाठी मुंबई विमानतळावर गेली होती, पण अभिनेता आलाच नाही. (Jd Majethia On Taarak Mehta Actor Gurucharan Singh)
जेडी मजेठिया यांनी ‘इटाइम्स’ला दिलेल्या मुलाखतीत सांगितले की, “गुरुचरण आणि माझी एक मैत्रीण आहे, भक्ती सोनी. मी एका मीटिंगमध्ये होतो जेव्हा तिने मला कॉल केला आणि सांगितले की एक गंभीर परिस्थिती आहे ज्याबद्दल तिला मला सांगायचे आहे. तिने मला सांगितले की, गुरुचरण सिंग २२ एप्रिलपासून बेपत्ता आहे. २२ एप्रिल रोजी तो मुंबईत येणार होता. दिल्ली विमानतळावरून फ्लाइट पकडण्यासाठी तो घरातूनही निघाला पण तो मुंबईला पोहोचू शकला नाही. भक्ती त्याला घेण्यासाठी विमानतळावरही गेली, पण तो कुठेच सापडला नाही”.
जेडी मजीठिया यांनी सांगितले की, “जेव्हा त्यांनी आणि भक्तीने विमानतळ प्राधिकरणाकडे याबाबत चौकशी केली तेव्हा त्यांना कळले की गुरुचरण सिंग फ्लाइटमध्ये चढले नव्हते. पण जेडी मजीठियाच्या म्हणण्यानुसार, फ्लाइटमध्ये चढण्यापूर्वी गुरुचरण सिंह यांनी भक्ती सोनी यांना मेसेज केला होता की, ते बोर्डिंग प्रक्रिया सुरु करणार आहेत”. जेडी मजिठिया पुढे म्हणाले, “गुरुचरणचे पालक त्याचा शोध घेत होते आणि एका दिवसानंतर त्यांनी जवळच्या पोलीस ठाण्यात हरवल्याची तक्रार दाखल केली. त्याचे आई-वडील खूप वृद्ध असून त्यांची तब्येत बरी नसते. जेव्हा भक्तीने मला सांगितले, तेव्हा मी सर्वप्रथम जागरुकता पसरवण्यासाठी संदेश पाठवला जेणेकरून ते कारवाई करतील. मी ही माहिती ‘तारक मेहता का उल्टा चष्मा’ च्या टीमबरोबरही शेअर केली आहे आणि दिलीप जोशी आणि इतर सर्वांशी संपर्क साधला आहे”.
गुरुचरण सिंह यांच्या मानसिक आरोग्याबाबत विचारले असता, जेडी मजिठिया यांनी ते पूर्णपणे ठीक असल्याचे सांगितले. त्यांनी दिलीप जोशी यांना याबद्दल विचारले असता त्यांनी सांगितले की, गुरुचरण सिंग एक अद्भुत व्यक्ती आहे आणि अभिनेत्याने सुखरूप घरी यावे अशी त्यांची इच्छा आहे. पोलिसांना एक सीसीटीव्ही फुटेज मिळाले आहे ज्यामध्ये गुरचरण सिंग तेथून जाताना दिसत आहेत, परंतु अद्याप अभिनेत्याचा कोणताही सुगावा लागलेला नाही. त्याचा फोनही बंद आहे. मात्र, गुरचरण सिंग यांच्या फोनचे व्यवहार पोलिसांना मिळाल्यावर त्यांना काही गोष्टींबाबत संशय आला. या संशयाचा खुलासा अद्याप झालेला नाही.