रंगमंच व कलाकार यांचं वेगळंच नातं आहे. रंगमंचापासून कलाकारांचा सिनेसृष्टीतील प्रवास सुरु होतो असं म्हणणं चुकीच ठरणार नाही. काल २७ मार्च रोजी जागतिक रंगभूमी दिवस साजरा करण्यात आला. अनेक कलाकारांनी या खास दिनाचं औचित्य साधत सोशल मीडियावरुन पोस्टही शेअर केल्या. अशातच अभिनेता प्रथमेश परबने शेअर केलेल्या पोस्टने साऱ्यांचं लक्ष वेधून घेतलं. प्रथमेशने रंगभूमी दिनानिमित्त ‘Reels आणि रंगमंच’ असं कॅप्शन देत रंगभूमी, कलाकार आणि रील्सचं जग यातील फरक सांगितला आहे. (Prathamesh Parab On Reels)
कॉलेजमध्ये पार पडणाऱ्या एकांकिका स्पर्धांमुळे आयुष्य कसं बदलतं, ते रंगभूमीशी जोडलं जाणार नातं याबाबत त्याने या पोस्टमध्ये मत मांडलं आहे. “आज २७ मार्च २०२४! जागतिक रंगमंच दिवस. नाटक जगलेल्या आणि नाटकावर मनापासून प्रेम करणाऱ्या प्रत्येक कलावंताला व त्या कलेवर भरभरून प्रेम करणाऱ्या मायबाप रसिक प्रेक्षकांना मन:पूर्वक शुभेच्छा. आमच्या वेळेस ११ वीला कॉलेजमध्ये प्रवेश घेताना, कलेची आवड असणारा तो किंवा ती, ज्या कॉलेजमध्ये एकांकिका किंवा नाटकाला जास्त महत्त्व मिळेल त्या कॉलेजला प्राधान्य देत असत”.
प्रथमेशने पुढे म्हटलं आहे की, “काळ बदलला, माध्यमं बदलली आणि आजकाल एकांकिकेच्या क्रेझची जागा हळुहळू रीलने घेतली. Reel हे माध्यमही चांगलच आहे म्हणा, त्यातही चांगला कंटेन्ट सादर करता येतोच, पण तरीही अभिनयाची आवड असणाऱ्या प्रत्येकाने एकदा तरी रंगमंच जगायला हवा”, असं म्हणत reel व रंगमंच यांतील फरक दाखवून दिला आहे”.
यापुढे त्याने म्हटलं आहे की, “अनेक महिन्यांची तालीम, पाठांतर, एकांकिका स्पर्धा आणि त्यानंतर एका दमात सादर केलेलं नाटक, खूप रिटेक घेऊन शूट केलेल्या रीलपेक्षा जास्त जिवंत वाटतं. वेगवेगळ्या ट्रान्झिशन आणि स्लो मोशनपेक्षा फिरता रंगमंच अंगावर जास्त काटा आणतो. रीलवर आलेल्या कमेंट्स वाचून छान वाटतं पण स्टेजवर लाइव्ह परफॉर्म करताना, आपल्यासाठी वाजणाऱ्या शिट्ट्या आणि टाळ्या यांसारखी दुसरी शाबासकीची थाप नाही”, असं प्रथमेशने त्याच्या या पोस्टमध्ये म्हटलं आहे.