ओटीटी प्लॅटफॉर्मवर सध्या रवी जाधव दिग्दर्शित ‘ताली’ या वेबसीरिजची जोरदार चर्चा सुरु आहे. सुष्मिता सेनची मुख्य भूमिका असलेली ही सीरिज तृतीयपंथी गौरी सावंत यांच्या जीवनावर आधारित आहे. तृतीयपंथीयांच्या हक्कासाठी लढा देणाऱ्या गौरी यांचा संपूर्ण प्रवास अंगावर काटा आणणारा आहे. सीरिजच्या माध्यमातून त्यांचा हा प्रवास प्रेक्षकांपर्यंत उत्तम पद्धतीने पोहोचवण्यात आला आहे. विशेष म्हणजे मराठी कलाकारांच्या महत्त्वाच्या भूमिका ‘ताली’मध्ये आहेत.
सुव्रत जोशी, हेमांगी कवी, ऐश्वर्या नारकर, कृतिका देव आदी मराठी कलाकार या वेबसीरिजमध्ये विशेष भाव खाऊन गेले आहेत. या कलाकारांच्या कामाचं सर्वत्र कौतुकही होताना दिसत आहे. अशामध्येच आता सुष्मितानेही या कलाकारांचं तोंडभरुन कौतुक केलं आहे. तसेच त्यांच्याबरोबर काम करण्याचा अनुभवही सुष्मिताने सांगितला.
‘ताली’निमित्त दिलेल्या एका मुलाखतीत सुष्मिता म्हणाली, “मराठी कलाकारांबरोबर काम करण्याचा अनुभव काही वेगळाच आहे. हे सगळेच उत्तम कलाकार आहेत. नाटकासारखं ते प्रत्येक भूमिकेचा अभ्यास करतात. मराठी कलाकार साकारत असलेली प्रत्येक भूमिका स्वतः जगतात. हेच त्यांचं वैशिष्ट्य आहे”. सुष्मिता मराठी कलाकारांबाबत अगदी भरभरुन बोलली.
पुढे ती म्हणाली, “या सगळ्या कलाकारांबरोबर काम करण्याची मजा वेगळी होती. तसेच त्याचं दडपणही होतं. म्हणूनच त्यांच्याबरोबर काम करण अजिबात सोपं नव्हतं. मी मराठी भाषा शिकले”. शिवाय रवी जाधव यांनी सुष्मिताला मराठी भाषा शिकवली. गौरी सावंतसाठी सुष्मिताने केलेली मेहनत वेबसीरिज पाहिल्यानंतर लक्षात येते.