मराठी सिनेसृष्टीतील एव्हरग्रीन अभिनेते अशोक सराफ यांना नुकतंच शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं. या कार्यक्रमाला सांस्कृतिक मंत्री सुधीर मुनगंटीवारही उपस्थित होते. यावेळी सुधीर मुनगंटीवार यांनी मोठी घोषणा केली. अशोक सराफ यांच्या नावाची पद्मश्री पुरस्कारासाठी शिफारस करणार असल्याचं यावेळी सुधीर मुनगंटीवार यांनी सांगितलं. (Ashok Saraf On Janta Raja)
इतक्या लोकांसमोर बोलण्याची सवय नाही आणि भीती वाटते, असं म्हणत अशोक सराफ यांनी पुरस्कार स्वीकारल्यानंतर त्यांच्या भावना व्यक्त केल्या. यावेळी त्यांनी शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांना भेटता आलं नाही, पण त्यांच्यासोबत राहण्याचा अनोखा योग आल्याची आठवणही सांगितली. बाबासाहेब पुरंदरे यांच्या ‘जाणता राजा’ या महानाट्यासाठी आवाज देण्याची संधी लाभली. मी या माध्यमातून त्यांच्यासोबत राहु शकलो. असं अशोक सराफ यांनी सांगितलं.
अशोक मामा म्हणाले, “जाणता राजाचा रेकॉर्डिंस्ट उदय चित्रे माझा मेहुणा आहे. त्याने निरोप आणला, तो म्हणाला की बाबासाहेब रेकॉर्ड करतायत. त्यात तु रेकॉर्ड करावं असं वाटतं. तर ते म्हणाले की बाबासाहेबांचंं म्हणणं आहे की, मी शिवाजी महाराजांचा आवाज द्यावा. अरे बापरे, मला बसल्या ठिकाणी घाम फुटला. मी नाही करू शकत असा निरोप द्यायला सांगितलं”.
“शिवाजी महाराजांचा आवाज द्यायचा? मी? मला काही माहिती नाही, छत्रपती शिवाजी महाराज कसे होते, ते कसे बोलत होते, छत्रपती शिवाजी महाराजांचा आवाज कसा होता, धीरगंभीर होता, वरच्या स्वरात होता की ते कुठल्या स्वरात बोलायचे हे नाही माहिती त्यांना सांगा मी नाही देत. माझा एक ओळखीचा आवाज आहे. तो जर शिवाजी महाराजांच्या रेकॉर्डिंगमध्ये मधेच दिसला तर तो बरोबर दिसणार नाही. तो त्यांचा अपमान ठरला असता.”
“बाबासाहेबांनी नाट्यशिल्प उभा केलंय त्याला तोड नाही. ‘जाणता राजा’ हा प्रोग्रॅम मी पाहिला होता. चकीत होऊन गेले होते सगळे, मलाही त्याचा भाग असावा असं वाटत होत. बाकी काहीही रेकॉर्ड करेन पण मी शिवाजी महाराजांचा आवाज रेकॉर्ड नाही करणार, कारण माझी तेवढी कुवत नाही, लायकी नाही, मी बाजीप्रभू देशपांडेंचा आवाज रेकॉर्ड करू शकेन”, असा निरोप अशोक सराफ यांनी पुढे पाठवला.